नाटके सुरू ठेवण्यासाठी ‘नाटकं’ करा बंद...


पुणे :
साहेब, कोरोनाकाळात बंद असलेल्या नाट्यव्यवसायाचा पडदा उघडत असतानाच, त्यावर ‘पडदा’ टाकण्याचा प्रयत्न अनेक नेतेमंडळी सध्या करीत आहेत. ही मंडळी लाइव्ह पत्रकारपरिषदा घेत असल्याने सर्वसामान्यांचे भरपूर मनोरंजन होत आहे. त्यामुळेच तिकीट काढून कोणीही थिएटरकडे फिरकत नाही. ‘त्वरा करा, त्वरा करा...अगदी थोडी तिकिटे शिल्लक’ अशा नाटकासारख्याच जाहिराती नेतेमंडळींकडून होत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीतील इच्छुक उमेदवार ‘तिकिटा’च्या अपेक्षेने का होईना पत्रकार परिषदेसाठी गर्दी करतात म्हणे! काळ बदलल्याची ही ‘नांदी’ आहे.

‘करणार! करणार! ‘साडेतीन व्यक्तींचा पर्दाफाश करणार,’ मंगळवारी दुपारी चारला तुमची वेळ राखीव ठेवा,’ ‘बहुसंख्येने टीव्हीसमोर या’ अशा जाहिराती एका पत्रकारपरिषदेच्या केल्या होत्या. खूप हवा झाल्याने या पत्रकारपरिषदेचं सगळं बुकिंग हाऊसफुल्ल झालं. मात्र, शेवटपर्यंत साडेतीन व्यक्तींची नावे कळली नाहीत. हे म्हणजे नाटकाला दिलखेचक नाव देऊन, गर्दी जमवायची आणि दुसरंच काही तरी दाखवायचं, अशातला हा प्रकार झाला.

साहेब, या पत्रकारपरिषदेमुळे आम्हाला त्यादिवशी अनेक नाटकांचे प्रयोग रद्द करावे लागले. ज्यांनी रद्द केले नाहीत, त्यांच्या प्रयोगाला इनमीन दोन-तीन प्रेक्षक आले होते. दुसऱ्या दिवशी आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी दुसऱ्या नेत्याने दिल्लीत प्रयोग लावला. अनेकांनी स्थानिक कलाकारांना बरोबर घेऊन प्रत्युत्तराचे प्रयोग रंगवले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही नाटकाला थंडा प्रतिसाद मिळाला.

साहेब, हे हल्ली नेहमीचं झालंय. सगळेच जण पत्रकार परिषदेची जोरात जाहिरात करतात. ‘याल तर हसाल, न याल तर पस्तवाल’ असा बोर्डही एकाने लावला होता. ‘हसता हसता विचार करायला लावणारी पत्रकारपरिषद,’ ‘वरिष्ठ नेत्यांनी गौरवलेली पत्रकार परिषद’, ‘भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्यांनी आवर्जुन पहावी अशी पत्रकार परिषद’, ‘सलग दोन हजारावी विक्रमी यशाची पत्रकार परिषद’ अशा काहींनी जाहिराती केल्या होत्या. मात्र, ‘फक्त एकच शेवटचा प्रयोग’ अशी पत्रकारपरिषदेची जाहिरात एकाही नेत्याने अद्याप केली नाही, याची खंत वाटते. उलट याचा दुसरा प्रयोग आम्ही दोन दिवसांनी सादर करू, असं म्हणून उत्सुकता चाळवली जाते. आम्ही नाटकमंडळी जसे नाटकांचे दौरे काढतो. तसे राजकारणी मंडळीही आपल्या पत्रकारपरिषदांसाठी दौरे काढत आहेत. एकाने मुंबईत पत्रकारपरिषदेचा पहिला प्रयोग लावला तर त्याचा दुसरा प्रयोग दिल्लीत होतो. ‘खास लोकग्रहास्तव’ आम्ही हा गैरव्यवहार बाहेर काढत आहोत’, अशी सुरवात करून, आरोपांच्या फैरीची ‘तिसरी घंटा’ वाजवली जाते. आमची नटमंडळी एखाद्या नाटकातील डायलॉग गाव बदलले म्हणून कधीच बदलत नाहीत. अगदी हाच कित्ता नेतेमंडळीही गिरवत आहेत. प्रत्येक पत्रकार परिषेदेत आरोपांचे तेच तेच डॉयलॉग म्हणून तेही कधी कंटाळत नाहीत.

साहेब, कसलेल्या नटमंडळींनाही गुंडाळून ठेवतील, एवढे अभिनयकौशल्य नेतेमंडळींकडे येते कोठून, हा प्रश्‍न आम्हाला पडला आहे. साहेब, नेत्यांच्या पत्रकारपरिषदांतून हजारो कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे आकडे बाहेर येतात आणि आमच्या एका प्रयोगाचं उत्पन्न पाच-सहा हजारांच्या पुढे जात नाही. त्यामुळे आमच्यात न्यूनगंड निर्माण होत आहे.

ता. क - अशीच परिस्थिती कायम राहिली तर आम्ही नाटकवाल्या मंडळींनी करायचे काय? त्यामुळे आमची ‘नाटके’ चालू राहण्यासाठी त्यांची ‘नाटके’ बंद करण्याचे आदेश तुम्ही द्यावेत, ही विनंती. अशा पत्रकारपरिषदा लाइव्ह दाखवणे बंद करावे व रात्री सातच्या बातम्यांत दीड-दोन मिनिटांत त्या दाखवाव्यात. त्यामुळे आम्हा नाटकवाल्यांबरोबरच सर्वसामान्य माणसेही सुखाची झोप घेतील, अशी आशा आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या