एसटीचा संप संपेना ; कामगार ठाम !


अहमदनगर :
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपास सुमारे साडेतीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी कामावर हजर होणे गरजेचे होते. मात्र ते संपावर ठाम असल्याने एसटी प्रशासनाकडूनही कारवाई सुरु करण्यात आली आहे. हा कारवाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्या, तरी संपामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने तेही संपाला वैतागले आहेत. राज्य सरकारनेही संप मिटविण्याची घाई करू नये, तसेच कर्मचाऱ्यांनीही मागणी मान्य होईपर्यंत कामावर येऊ नये, आम्ही आमची सोय करू, असा उपरोधिक सल्ला ते देत आहेत.

मागील साडेतीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीची सेवा बऱ्याच ठिकाणी ठप्प झाली आहे. आज अखेरपर्यंत एसटीचे ११७४ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. सध्या जिल्ह्यात खासगी वाहतूक जोमाने सुरू आहे. विशेष म्हणजे काही बसस्थानकांत खासगी वाहने प्रवासी घेत आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण ११७४ कर्मचारी विविध आगारांमध्ये कामावर हजर झाले. यामध्ये प्रशासकीय ३४२, यांत्रिकी ३६४, चालक १८९, वाहक २६६, चालक तथा वाहक १३, असे कामगार कामावर हजर झाले आहेत.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या जरी योग्य असल्या, तरी प्रवाशांचेही हितही त्यांनी पाहणे गरजेचे आहे. या संपामुळे खासगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची लूट होत आहे. त्यामुळे एसटीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. एसटी प्रशासनाने आज अखेर जिल्ह्यातील एकूण ३५४ जणांवर बडतर्फची कारवाई केलेली असून, ३०६ जणांचे निलंबन करण्यात आले आहे.


विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. बस नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा, महाविद्यालयांत जाता येत नाही. त्यामुळे पालकांतूनही एसटी कर्मचाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली जात आहे.


आकडे बोलतात
एकूण कर्मचारी ः ३४७५
गैरहजर कर्मचारी ः १९४०
हजर झालेले कर्मचारी ः ११७४
आठवडा सुट्टीवर असलेले ः १२९
रजा व पगारी सुट्टीवरील ः १८६
इतर आगारांत कामगिरीवर असलेले ः २९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या