टीईटी गैरव्यवहारात अपात्र उमेदवारांची जबाबनोंदणी


टीईटी २०१९-२० गैरव्यवहाराच्या तपासात पैसे देऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी शिक्षण विभागाला सादर करण्यात आली आहे.

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात राज्यभरातील अपात्र उमेदवारांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात येत आहे. गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असल्याने सायबर गुन्हे शाखेकडून प्रत्येक जिल्ह्यातील दहा उमेदवारांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत. पैसे देऊन पात्र ठरलेल्या राज्यातील सात हजार ८०० उमेदवारांची यादी शिक्षण विभागाकडून पडताळून घेण्यात आली आहे.

टीईटी २०१९-२० गैरव्यवहाराच्या तपासात पैसे देऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी शिक्षण विभागाला सादर करण्यात आली आहे. या यादीची पडताळणी करण्यात आली असून पैसे देऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांनी जबाब नोंदविण्यासाठी हजर रहावे, अशा आशयाचे नोटीसवजा पत्र सायबर गु्न्हे शाखेकडून पाठविण्यात येणार आहे. अपात्र उमेदवारांची यादी शिक्षण विभागाला सादर करण्यात आली असून शिक्षण विभागाने यादीची पडताळणीही केली असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली. कायदेशीरदृष्टय़ा जबाब नोंदवणे ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. जबाब नोंदविण्याच्या प्रक्रियेतून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळणार असून या माहितीचा उपयोग तपासासाठी केला जाणार आहे.

टीईटी गैरव्यवहार प्रकरणात शालेय शिक्षण विभागाचे तत्कालिन उपसचिव सनदी अधिकारी सुशील खोडवेकर, राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालिन आयुक्त तुकाराम सुपे, सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचे तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेली कंपनी जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीसचे संचालक डॉ. प्रीतीश देशमुख, अश्विनीकुमार आणि दलालांना अटक करण्यात आली आहे.  यादीची पडताळणी राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्यातून पैसे घेऊन पात्र ठरलेल्या राज्यभरातील सात हजार ८८० उमेदवारांची यादी मिळाली आहे. याप्रकरणाचा सायबर गुन्हे शाखेने सखोल तपास करून अपात्र उमेदवारांची यादी शिक्षण विभागाकडे पाठविली होती. या यादीची शिक्षण विभागाने पडताळणी केली. त्यानंतर शिक्षण विभागाने यादी पुन्हा सायबर गुन्हे शाखेकडे पाठविली. या यादीतून पैसे देऊन पात्र ठरलेले किती उमेदवार शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, याबाबतची माहिती घेण्याचे काम शिक्षण विभागाकडून केले जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या