अण्णांचे उपोषण स्थगित ; सरकारला निर्णय मागे घेण्यासाठी तीन महिन्यांचा अल्टिमेटम

पारनेर : राज्य सरकारने सुपर मार्केट व किराणा दुकानांतून वाईन विक्रीच्या घेतलेल्या निर्णया विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. आज (रविवार) राळेगणसिद्धीत आयोजित ग्रामसभेत अण्णांनी उपोषण करू नये, असा निर्णय हात उंचावून बहुमताने घेण्यात आला. त्यानंतर हजारे यांनी उद्यापासून (ता. १४) सुरू करण्यात येणारे उपोषण तूर्त स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. तसेच राज्य सरकारला निर्णय मागे घेण्यासाठी तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला. राज्य सरकारने वाईन विक्री संदर्भात घेतलेल्या निर्णयाविरोधात हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून हा निर्णय मागे न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वत्सा नायर यांनी हजारे यांची राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून काल (ता.१२) भेट घेतली होती. या वेळी त्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. आज यादव बाबा मंदिरासमोर सावळेराम पठारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी ग्रामसभा सर्वोच्च असते. ग्रामसभेने घेतलेला निर्णय मला मान्य आहे. मात्र तरीही सरकारला याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देत आहे, असेही हजारे यांनी या वेळी जाहीर केले. ते म्हणाले, वाईन जर किराणा दुकानात ठेवली, तर लहान मुले, तरुणही व्यसनाधीन होतील. संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर यांच्या संस्कारांतून महाराष्ट्र घडला आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पिढ्या बरबाद होतील. वाईन विक्रीसाठी दुकाने कमी आहेत का. मग किराणा दुकानात विक्री कशासाठी, असाही प्रश्न हजारे यांनी उपस्थित केला. सरकारला लोकांना व्यसनाधिन बनवायचे आहे का, समाज व्यसनाधीन झाला, तर सरकारला आपले हित साध्य करता येईल का, असे सवालही त्यांनी उपस्थित केले. तसेच उपोषणाचा निर्णय मागे घेतला. मला तुमच्या राज्यात जगण्याची इच्छा नाही. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. वाईन ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असा निरोप दिल्यानंतर सरकारच्या हालचाली सुरू झाल्या. जनतेला विचारात घेतल्याशिवाय वाईन बाबतीत निर्णय घेणार नाही, असे आश्‍वासन शासनाने दिले आहे. तसे पत्रही दिले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या