Breaking News

डी.फार्म. पदविकाधारकांना पात्रता परीक्षा बंधनकारक

 


औषधनिर्माण शास्त्र विषयात पदविका प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता फार्मासिस्ट म्हणून काम करण्यापूर्वी पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याचे भारतीय औषधशास्त्र परिषदेने अधिसूचनेद्वारे शुक्रवारी स्पष्ट केले आहे.

मुंबई : औषधनिर्माण शास्त्र विषयात पदविका प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता फार्मासिस्ट म्हणून काम करण्यापूर्वी पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याचे भारतीय औषधशास्त्र परिषदेने अधिसूचनेद्वारे शुक्रवारी स्पष्ट केले आहे. डिप्लोमा इन फार्मसी अभ्यासक्रम (डी.फार्म.) पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट म्हणून राज्य औषधशास्त्र परिषदेकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. ही नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या राज्यांमध्ये फार्मासिस्ट म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाते. परंतु आता डी.फार्म. केलेल्या विद्यार्थ्यांना केवळ नोंदणी करून काम करता येणार नाही. तर त्यांना पात्रता परीक्षाही उत्तीर्ण करावी लागणार आहे.

विविध राज्यांमधून फार्मासिस्टची पदविका घेऊन राज्यात नोंदणी करणाऱ्या फार्मासिस्टचे प्रमाण अधिक आहे. या फार्मासिस्टने त्या राज्यांमध्ये केलेल्या पदविका अभ्यासक्रमामध्ये आवश्यक ज्ञान अंतर्भूत केलेले असतेच असे नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फार्मासिस्ट म्हणून काम करण्याचे ज्ञान अवगत आहे का, याची पडताळणी या परीक्षेत केली जाणार आहे.  डी.फार्म. उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा देता येईल. या परीक्षा घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली जाईल. ही परीक्षा बहुपर्यायी(एमसीक्यू) पद्धतीने होणार असून  औषधोत्पादन, औषधशास्त्र, वनस्पती व प्राणिज औषध उत्पादनाचा व त्यांच्या परिणामांचा अभ्यास, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, जीव रसायनशास्त्र, रुग्णालय आणि चिकित्सक औषधशास्त्र, औषधोत्पादन आणि न्यायशास्त्र  यम विषयांवर आधारित असेल. ही परीक्षा इंग्रजी भाषेत असेल. परीक्षेसाठी तीन प्रश्नपत्रिका असतील. त्या प्रत्येक विषयात किमान ५० टक्के गुण प्राप्त झाल्यास उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र राज्य औषधनिर्माणशास्त्र परिषदेकडे सादर केल्यावरच फार्मासिस्टचा नोंदणी क्रमांक दिला जाईल. या परीक्षेसाठी वयाची किंवा किती प्रयत्नांमध्ये उत्तीर्ण व्हावे याची कोणतीही अट नाही, असे या अधिसूचनेत नमूद केले आहे.

No comments