मदत करू शकत नाही तर खिसा का कापता ; आशिष शेलारांनी साधला निशाणा


“प्रशासकाच्या आडून हे करायचे ठरलं होत का?” असा सवाल देखील शिवसेनेला उद्देशून केला आहे.

मुंबईकरांवर २०२२-२३ या आर्थिक वर्षा मालमत्ताकराचा बोजा पडणार असल्याचे दिसत आहे. कारण, करोनामुळे टाळलेली मालमत्ता करातील वाढ १ एप्रिलपासून लागू करण्याचा विचार पालिका प्रशासन पातळीवर सुरू आहे. मालमत्ता करात साधारण १४ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

“मुंबई महापालिकेतील “माजी” कारभाऱ्यांनी आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला, तेव्हा कोणत्याही प्रकारची कर वाढ नाही अशा फुशारक्या मारल्या मग प्रशासक बसताच मालमत्ता करात वाढ कुठून आली? प्रशासकाच्या आडून हे करायचे ठरलं होत का?” असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

तसेच, “महापालिकेवर प्रशासक बसला असला तरी राज्याच्या सत्तेच्या खुर्चीत तुम्हीच बसला आहात ना? करोनामुळे मुंबईकरांचे अर्थकारण बिडलेय हे दिसतेय ना? काही मदत करु शकत नाही तर किमान मुंबईकरांचा खिसा तर कापू नका! आता मुंबईकरांकडून पण ही “वसूली” करणार का?” असं म्हणत आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे.

आता मालमत्ता कर रेडीरेकनरच्या दराशी जोडण्यात येणार आहे. रेडीरेकनर दरानुसार भाडंवली मूल्य निश्चित करण्यात येणार आहे. भांडवली मूल्य वाढल्यानंतर आपोआप मालमत्ता कराचा भारही वाढेल. ही दरवाढ २०२० पासून अपेक्षित होती. परंतु करोना संसर्गामुळे ही दरवाढ रोखण्यात आली होती. मात्र आता १ एप्रिलपासून नव्या दरानुसार मालमत्ता कर वसूल करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मालमत्ताधारकांना २०२२-२३ या आर्थिक वर्षांतील मालमत्ता कराची देयके देण्यात येणार असून ही देयके नव्या कररचनेनुसार असतील, असे देखील पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या