यशवंत जाधव यांच्या डायरीतील ‘मातोश्री’ उल्लेखावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…


यशवंत जाधव यांच्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये आणि ५० लाख रुपयांचे घड्याळ दिल्याची नोंद

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या यांच्या काही मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून जप्त करण्यात आल्या असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये आणि ५० लाख रुपयांचे घड्याळ दिल्याची नोंद असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान हा उल्लेख आपल्या आईबाबतचा असल्याचा खुलासा यशवंत जाधव यांनी प्राप्तिकर विभागाकडे केला आहे. युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते राजापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


“अफवांवर किती बोलायचं आणि अधिकृत गोष्टींवर किती बोलायचं यापुरतं मी मर्यादित ठेवतो,” असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. “आत्ताच्या काळात अफवा किती पसरवल्या जात आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. खूप गैरप्रकार सुरु आहे. यंत्रणा तर आहेत पण अफवांच्या बातम्या पाठवल्या जात असून त्यात मी जाणार नाही. अधिकृत गोष्टी समोर येतील. पण बदनामीच्या आणि अफवांच्या मुद्द्यावर मी भाष्य करणार नाही,” असं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.

यंत्रणा मातोश्रीच्या दरवाजापर्यंत पोहोचल्यासंबंधी विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “हे राजकीय षडयंत्र आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपाचं सरकार नाही तिथे या गोष्टी सुरु आहेत. ना घाबरता या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे. टक्कर द्यायला महाराष्ट्र सज्ज आहे. बंगाल, महाराष्ट्र जिथे जिथे यंत्रणा मागे लागत आहेत तिथे तोंडावर पडत आहेत. राजकारण एके ठिकाणी पण जे घाणेरडं राजकारण सुरु आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. ही महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती नाही. लोकं सरकार बनवत असतात, पाडत असतात पण जे नैराश्य येतं त्यातून हे सुडाचं राजकारण सुरु असून महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे”.


“गेल्या दोन अडीच वर्षात ज्याप्रकारे भाजपा सर्व पक्षांना वागणूक देत असल्याचं पाहिलं आहे. वाढती महागाई, बेरोजगारी लपवण्यासाठी यंत्रणा तसंच हे विषय समोर आणले जात आहेत का हादेखील प्रश्न आहे. हे राजकारणापेक्षा मोठे विषय असून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामं, विकास करत राहणं गरजेचं आहे,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. भाजपासोबत पुन्हा मैत्री होण्यासंबंधी प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरेंनी “तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल, जोर जबरदस्ती करत असेल तर मैत्री करणार का?,” असा प्रतिप्रश्न विचारला.

शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी जाहीर केलेल्या नाराजीवरही आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं. तानाजी सावंत यांनी निधी वाटपात पक्षाला दुय्यम स्थान दिलं जात असल्याचा आरोप केला आहे. यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, “मीदेखील मुंबई उपनगराचा पालकमंत्री आहे. प्रत्येकजण कुठला तरी पालकमंत्री असतो. महाविकास आघाडीसारखा प्रयोग राजकीयदृष्ट्या आणि विकासासाठी यशस्वी ठरला आहे. काही ठिकाणी दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढलेले असतात तिथे ही खदखद होते. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते एकत्र बसून या नाराजी दूर करतात. राजकारणात थोडं पुढे मागे हे चालत राहतं. पण आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र आलो असून पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत हे महत्वाचं आहे”.

“सत्तेतून बाहेर पडण्यासंबंधी त्यांचं मत वैयक्तिक असेल. पण अर्थसंकल्पात आत्ताही आणि आधीही सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रत्येक मतदारसंघाला भेदभाव न करता न्याय देण्याचा प्रयत्न आहे. नाराजी साहजिक असते पण ती दूर करण्याचा प्रयत्न आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.


“नाणारमध्ये रिफायनरीचा प्रस्ताव होता. लोकवस्ती असल्याने नाणारमधून बाहेर हलवण्यात आलं आहे. चांगला मोठा प्रकल्प येत असेल तर तेथील स्थानिकांसोबत, भुमीपुत्रांसोबत चर्चा करुन त्यांचे हक्क कसे अबाधित राहतील हे पाहणं सरकारची प्राथमिकता आहे. त्यांचा विश्वास संपादित करुन पुढं जायचं आहे. विश्वासावर पाय देऊन पुढे जाणार नाही हे आश्वासित करतो. दोन्ही बाजूंच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करुन त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडेन,” अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या