Breaking News

लतादीदी आदर्श जीवनाचा वस्तुपाठच ! सरसंघचालक मोहन भागवत यांची भावना


भागवत म्हणाले, की लहान वयापासून लतादीदींनी खडतर जीवनाचा धैर्याने सामना केला

पुणे : देवदत्त स्वर लाभलेल्या लतादीदींचे अस्तित्व चिरंतन आहे. खडतर जीवनाचा धैर्याने सामना केलेल्या लतादीदी या आदर्श जीवनाच्या वस्तुपाठच होत्या. त्यांचा हा वस्तुपाठ आपण आचरणात आणू शकलो तर ते आचरण हीच लतादीदींच्या अस्तित्वाची खूण असेल, अशा शब्दांत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी लता मंगेशकर यांना  श्रद्धांजली अर्पण केली.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातर्फे लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित सभेत भागवत बोलत होते. ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, गायक रूपकुमार राठोड, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड उपस्थित होते.

भागवत म्हणाले, की लहान वयापासून लतादीदींनी खडतर जीवनाचा धैर्याने सामना केला. अंधाराला प्रकाशामध्ये रूपांतरित केले. शुचिता, अनुशासन, करुणा, खडतर तपश्चर्या या गुणांच्या आधारे त्यांनी प्रतिकूल जीवनही सुंदर बनवले. वडिलांच्या वाटय़ाला आलेल्या दु:खाची सल त्यांच्या मनात होती. मात्र, त्यामुळे कटुता येऊ न देता विधायक प्रतिक्रिया म्हणून त्यांनी वडिलांच्या नावाने रुग्णालय उभारले. त्यांच्या निधनाने सर्वाना तणावमुक्त करणारा स्वर हरपला. गायनात त्या सर्वश्रेष्ठ होत्याच, परंतु इतर अनेक गोष्टीतही त्यांनी योगदान दिले. त्याबद्दल आपल्याला अद्याप पुरेशी माहिती नाही. दादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामासाठीही त्यांनी निधीपुरवठा केला. त्यांच्या निधनाने सर्वाना तणावमुक्त करणारा स्वर हरपला. मात्र, जोपर्यंत स्वर राहतील, तोपर्यंत लतादीदींचे अस्तिव कायम राहील.

राठोड म्हणाले, की लतादीदींमुळे आपल्याला साक्षात ईश्वराचा सहवास लाभला. माझ्यावर लतादीदींनी आईसारखं निव्र्याज प्रेम केले.

‘स्वरमाऊली’ लतादीदींचा मला ८० वर्ष सहवास लाभला. पण, खरे तर मला ती समजलीच नाही. कुसुमाग्रजांच्याच शब्दात सांगायचे तर, ‘..परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा,मला वाटते विश्व अंधारले’, अशीच तिच्या निधनाने माझी स्थिती झाली आहे, अशी भावना पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली.  ‘बाबा गेल्यानंतर १३ वर्षांची दीदी आमची बाबा झाली. माई गेली तेव्हा ती आमची आई झाली. तुमच्यासाठी लता मंगेशकर गेल्या. आमच्यासाठी मात्र, आमचं सर्वस्वच गेलं, असे सांगताना आशा भोसले यांना अश्रू आवरता आले नाहीत. मी दीदीपेक्षा चार वर्षांनी लहान होते. मी जणू तिची बाहुलीच होते. तिने माझ्यावर खूप प्रेम केले,’ असेही आशा भोसले म्हणाल्या.

बाबांच्या नावाने उभारलेल्या रुग्णालयात उपचारासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतील का, असे मी दीदीला विचारले होते. त्या वेळी, ‘तुझ्याकडे पैसे नाहीत का?’, असा प्रतिप्रश्न करून ‘तू दिलेल्या पैशांतून गरिबांवर उपचार होतील‘, हे दीदीने मला सांगितले होते.

आशा भोसले, ज्येष्ठ गायिका

No comments