उन्हाळी सोयाबीनची विक्रमी पेरणी


मागील वर्षी राज्यात प्रायोगिक तत्त्वावर केलेली उन्हाळी सोयाबीनची पेरणी यशस्वी झाल्यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात ४८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

४८ हजार हेक्टरवर पेरणी; बियाणांसह शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा


पुणे : मागील वर्षी राज्यात प्रायोगिक तत्त्वावर केलेली उन्हाळी सोयाबीनची पेरणी यशस्वी झाल्यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात ४८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. उत्पादित होणाऱ्या सोयाबीनमुळे आगामी खरिपातील सोयाबीन बियाणाचा प्रश्न मिटणार आहे, शिवाय सोयाबीनचे दर प्रति क्विंटल साडेसात हजारांवर गेल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

मागील वर्षीच्या (२०२१) खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले होते. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर कृषी विभाग आणि ‘महाबीज’ यांच्या पुढाकारातून सुमारे ६०० हेक्टरवर राज्यात पहिल्यांदाच उन्हाळी सोयाबीनची पेरणी झाली होती. उत्पादित झालेले सोयाबीन प्रामुख्याने यंदाच्या खरिपात बियाणे म्हणून वापरले गेले. मात्र, पुन्हा यंदाच्या खरिपातही अतिवृष्टीने सोयाबीनचे नुकसान झाल्यामुळे उन्हाळी सोयाबीन पेरणीसाठी कृषी विभाग आणि ‘महाबीज’ने खास मोहीम राबविली होती. त्याचा परिणाम म्हणून राज्यात ४८ हजार हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यात ‘महाबीज’च्या १३ हजार हेक्टरचा समावेश असून, त्यातून ‘महाबीज’ला दोन लाख क्विंटल सोयाबीन बियाणे मिळण्याची अपेक्षा आहे.

ही पेरणी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होते आणि काढणी एप्रिल-मार्च महिन्यांत होते, त्यामुळे उन्हाळी सोयाबीन पेरणी म्हटले जाते. मागील वर्षी उन्हाळी सोयाबीनच्या लागवडीतून खरिपातील बियाणांचा प्रश्न मिटला होता. शेतकरी बियाणांसाठी ७०-१२५ रुपये किलो दराने सोयाबीन विकतात. शिल्लक राहिलेले सोयाबीन खासगी बाजारात विकतात. यंदा जागतिक पातळीवर सोयाबीनचे उत्पादन घटल्यामुळे ३,९५० रुपये हमीभाव असताना देशांर्अतगत बाजारात सोयाबीन सध्या ७,५०० रुपये क्विंटलने विक्री होत आहे. ‘महाबीज’ही शेतकऱ्यांकडून सुमारे ७०-७५ रुपये दराने सोयाबीन खरेदी करते. त्यामुळे शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होत आहे. खरिपात बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने सरकारचा कृषी विभागही निश्चिंत झाला आहे.

पाण्याची चांगली उपलब्धता, कृषी विभाग, महाबीज आणि अन्य खासगी बियाणे कंपन्यांच्या पुढाकारातून राज्यात ४८ हजार हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनची पेरणी झाली आहे. उस्मानाबाद, बुलडाणा, अकोला, परभणी आदी परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. खरिपाच्या तुलनेत नुकसानीची शक्यता कमी असल्यामुळे भविष्यात उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्र वाढतच जाणार आहे. – दिलीप झेंडे, संचालक, कृषी विभाग, निविष्ठा व गुणनियंत्रण

सोयाबीनला सध्या चांगला दर आहे. मात्र खरिपात सोयाबीन काढणीला आल्यावर पाऊस सुरू झाल्याने उत्पादन घटीसह सोयाबीनचा दर्जा घसरला होता. त्यामुळे बियाणांसाठी उन्हाळी पेरणी गरज होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या