बीडमध्ये हवाला रॅकेटचा पर्दाफाश


लाखोंची रक्कम जप्त, कार्यालये थाटून सुरू होता पैशांचा काळाबाजार

बीड : जिल्ह्यातील केज तालुक्यात हवाला रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन ठिकाणी छापेमारी केली असता तिथे लाखोंची रक्कम आढळून आली आहे. पोलिसांनी सर्व रक्कम जप्त केली असून तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित सर्व आरोपी आपलं कार्यालय थाटून पैशांचा काळाबाजार करत होते. पोलीस आरोपींची सध्या कसून चौकशी करत असून इतर ठिकाणांचा देखील खुलासा होण्याची शक्यता आहे. या घटनेचा पुढील तपास केज पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केज शहरात विविध ठिकाणी हवाला रॅकेट सुरू असल्याची माहिती केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे कुमावत यांनी संबंधित ठिकाणांवर पोलीस पथकं रवाना केली. त्यानुसार पोलिसांनी केज शहरातील कबाड गल्लीतील न्यू इंडिया अंगडिया, जालना रोडवरील आर क्रांती ट्रेडर्स आणि सिद्धीविनायक कॉम्पलेक्ससमोरील एका ठिकाणी धाडी टाकल्या.

या तिन्ही ठिकाणी मिळून एकूण 51 लाख 26 हजार रुपयांची रक्कम पोलिसांच्या हाती लागली आहे. तसेच पोलिसांनी पैसे मोजण्याचं यंत्र, मोबाइल आणि इतर साहित्य देखील जप्त केलं आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन व्यावस्थापकांना अटक केली आहे. मयू विठ्ठल बोबडे, हरीश रतिलाल पटेल आणि सुरज पांडुरंग घाडगे असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. संबंधित सर्व आरोपी आपलं कार्यालय थाटून दिवसाढवळ्या पैशांचा काळाबाजार करत होते. याठिकाणी आयकर चुकवून टोकन पद्धतीने पैशांची देवाण-घेवाण केली जात असल्याची  माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.

सर्व आरोपी सध्या केज पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. चौकशीतून या रॅकेटची व्याप्ती लक्षात येऊ शकते, तसेच हवाला रॅकेटच्या इतर ठिकाणांची माहिती देखील मिळण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे. हवाला रॅकेट कसं चालायचं, किती रुपयांचा व्यवहार व्हायचा, कमिशन किती मिळायचं अशा विविध प्रश्नांची उत्तर सध्या अनुत्तरित असून पोलीस सविस्तर तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या