फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून बाळासाहेब थोरातांचा टोला; म्हणाले, “त्यांनी एकदा आरशापुढं…”


व्यक्तिगत द्वेषाचं राजकारण व्हायला नको. राजकारण विकासाचं असायला हवं, असंही थोरात म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते भ्रष्टाचारात अडकले असून जनतेचा आघाडी सरकारमधील नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही. चार राज्यात यश मिळाले. आता मिशन महाराष्ट्र आहे.  २०२४ मध्ये राज्यात स्वबळावर भाजपचे सरकार सत्तेत येईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याच वक्तव्यावरून मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, “सध्या ज्या पद्धतीची राजकीय धुळवड राज्यात पाहायला मिळत आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. सध्याचा हा प्रकार लोकशाहीसाठी योग्य नसून तो अभिप्रेत नाही. व्यक्तिगत द्वेषाचं राजकारण व्हायला नको. राजकारण विकासाचं असायला हवं, द्वेषाचं राजकारण सगळ्यांसाठी मारक आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.


‘एमआयएम’ने राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या ऑफरवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…


“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ मध्ये सत्तेत आम्ही येणार, अशी घोषणा पुन्हा एकदा केली आहे. मी यापूर्वीही त्यांना अनेकदा म्हटलं आहे, आज पुन्हा म्हणतोय की, त्यांनी एकदा आरशापुढं उभं राहावं, त्यांना आरशात पुढचा विरोधी पक्षनेता दिसेल. देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचा पिंड हा राज्यात सत्तेत येण्यासाठी नव्हे, तर विरोधी पक्ष म्हणून काम करण्यासाठी बनलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही,” असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.  


काय म्हणाले होते फडणवीस ?

गोव्यात यश मिळाल्याने महाराष्ट्रातील जनतेचा भाजपावर विश्वास बसला आहे. वर्तमान राज्य सरकार हे घोटाळाबाजांचे सरकार आहे. रोज नवनवीन घोटाळे आणि गैरव्यवहाराची प्रकरणे समोर येत असल्याने सरकार कोंडीत सापडले आहे. माझ्याकडे आघाडीतील आणखी काही नेत्यांच्या विरोधात पुरावे आहेत. योग्य वेळी ते बाहेर काढण्यात येतील. गोव्यातील यशानंतर आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पुढे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमताने भाजपाची सत्ता येईल, असं फडणवीस म्हणाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या