तीन वर्षांत २० हजार लोकांना पासपोर्ट


बीड :
काही देशांचा अपवाद सोडला तर परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट (पारपत्र) आवश्यक आहे. पूर्वी पासपोर्टसाठी दूरच्या शहरांत खेटे मारावे लागत होते. यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय होई. पण, तीन वर्षांपूर्वी येथील डाक कार्यालयात पासपोर्ट सुविधा सुरु झाल्याने याचा जिल्ह्यातील २० हजार नागरिकांना लाभ झाला आहे.दहा वर्षांपूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी नको तेवढी खटाटोप, एजंटची खुशमश्करी आणि त्यालाही पैसे मोजावे लागत. नंतर ऑनलाइन सुविधा झाली पण मुंबई, पुणे, नागपूर अशा दूरच्या शहरांतच ही सोय होती.

नंतर पासपोर्ट कार्यालयांची संख्या वाढल्याने इकडे औरंगाबाद आणि तिकडे सोलापूरला ही सोय होती. परंतु, ऑनलाइन अपॉईंटमेंट नंतर मिळालेल्या वेळेत पोचणे आणि काही वेळा एखाद-दुसरा कागद नसेल तर पुन्हा दुबार सर्व प्रक्रिया करावी लागे. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडायची आणि वेळ व पैसाही यात खर्च व्हायचा. मात्र, केंद्र सरकारने सर्वच जिल्ह्याच्या ठिकाणी व डाक कार्यालयांत पासपोर्ट कार्यालये उघडण्याचा धोरणात्मक निर्णय तीन वर्षांपूर्वी घेतला.त्यानंतर येथील जिल्हा डाक कार्यालयात पासपोर्ट कार्यालयाची सुविधा झाली. खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्याहस्ते कार्यालयाचे उदघाटन झाले. या कार्यालयामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्टसाठी दूरवर खेटे मारण्यापासून मुक्ती मिळाली. आतापर्यंत या कार्यालयातून जिल्ह्यातील २० हजार नागरिकांच्या पासपोर्टसाठीच्या कागदपत्रांची पडताळणी झाली आहे.


येथे डाकघर अधीक्षक एस. एम. अली यांच्या मार्गदर्शनाखाली डाक साहाय्यक संजय देशमुख व बाबासाहेब जाधव हे दोघे कार्यरत आहेत. दोघांवर सुरु असलेल्या कार्यालयात देखील कागदपत्रांची पडताळणी व इतर सर्व तांत्रिक प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे. यामुळे आतापर्यंत २० हजार लोकांचे दूरवर जाण्याचा खर्च आणि वेळही वाचला आहे.

तत्काळची सुविधा आवश्यक

प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी व विशेषत: टपाल कार्यालयांच्या ठिकाणी पासपोर्ट सुविधा सुरु केली आहे. मात्र, पासपोर्टचे एक सामान्य व एक तत्काळ असे दोन प्रकार आहेत. काही लोकांना अचानक परदेशात जाण्यासाठी तत्काळ पासपोर्टची गरज असते. मात्र, येथील कार्यालयात तत्काळ पासपोर्टसाठीची नोंदणी नाही. तशी सुविधाही या ठिकाणी सुरु होण्याची गरज आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या