पुणेकरांनो लक्ष द्या, आता 'या' भागात तात्पुरतं भारनियमन होणार

 



पुणे :
विजेची वाढती मागणी आणि कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मितीत घट झाल्याने राज्यात वीजेची तूट निर्माण झाली असून, ती भरून काढण्यासाठी 'महावितरण'कडून गरजेनुसार तात्पुरते भारनियमन करण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागांतील १७ ते १८ वीजवाहिन्यांवर मंगळवारी अर्धा ते एक तासासाठी तात्पुरते भारनियमन करण्यात आले.

मंचर, मुळशी आणि राजगुरुनगर विभागातील ग्रामीण भागांत १७ ते १८ वीजवाहिन्यांवर कमीत कमी वेळेसाठी तात्पुरते भारनियमन करण्यात आले, अशी माहिती 'महावितरण'मधील सूत्रांनी दिली. उष्णतेच्या लाटेमुळे राज्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. औद्योगिक उत्पादनांसोबतच कृषिपंपाचा वीजवापर वाढला आहे. मात्र, देशात कोळशाची टंचाई निर्माण झाल्यामुळे औष्णिक वीजनिर्मितीत घट झाली आहे. त्यामुळे राज्यात अडीच ते तीन हजार मेगावॉट विजेची तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी शहरी व ग्रामीण भागांतील वीजवाहिन्यांवर गरजेनुसार भारनियमन करावे लागेल, असे 'महावितरण'ने सोमवारी स्पष्ट केले होते.

पुणे, पिंपरीत भारनियमन कमी?

राज्य वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे भारनियमन केले जाणार आहे. ज्या भागात वीजबिलांची थकबाकी अधिक आहे, तसेच वीजचोरी, आकडे टाकून वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक भाराचा वापर होतो, तिथे गरजेनुसार तात्पुरते भारनियमन केले जाऊ शकते. पुणे परिमंडळात पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि तालुक्याच्या ठिकाणी वाणिज्यिक व वितरण हानी कमी असल्याने तेथे भारनियमनाचा फटका बसण्याची शक्यता कमी आहे, असंही 'महावितरण'मधील सूत्रांनी सांगितले.


सध्या विजेची मागणी किती?


सध्याची वीजेची मागणी - २८,००० मेगावॉट


सध्याची वीजेची तूट - २,५०० ते ३,००० मेगावॉट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या