भरपाईसाठी अडीच लाख अर्ज ; करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या ७० टक्के कुटुंबीयांना राज्यात मदत

 



मुंबई:
राज्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या सुमारे २ लाख ५२ हजार कुटुंबीयांनी ५० हजार रुपये भरपाई मिळण्यासाठी अर्ज केले असून यातील सुमारे ७० टक्के कुटुंबीयांना भरपाई मिळाली आहे. दरम्यान राज्यातील मृतांच्या कागदोपत्री आकडेवारीपेक्षा जवळपास दुप्पट अर्ज भरपाईसाठी आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्यातील मदत आणि पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये भरपाई देण्यासाठी संकेतस्थळ डिसेंबर २०२१ पासून सुरू केले आहे. आत्तापर्यत २ लाख ५२ हजार अर्ज भरपाईसाठी प्राप्त झाले आहेत. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या स्तरावर त्याची छाननी झाल्यानंतर त्याला मंजुरी मिळते. आलेल्या अर्जापैकी १ लाख ७४ हजार अर्जाची छाननी पूर्ण झाली असून यांच्या खात्यावर भरपाई देखील जमा झाली आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार बुधवारपर्यत राज्यात १ लाख ४७ हजार ८३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु भरपाईसाठी मात्र २ लाख ५२ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच भरपाई दिलेल्या कुटुबांची संख्याही १ लाख ७४ हजारांच्या वर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चार निकषांवर या अर्जाची छाननी केली जात आहे. करोनाबाधित असल्याचा अहवाल असल्यास किंवा रुग्ण रुग्णालयात दाखल असताना वैद्यकीय तपासणीमध्ये करोनाची लागण झाल्याचे आढळले असल्यास अशा रुग्णाचीही करोना मृत्यू म्हणून नोंद करावी. तसेच करोनाबाधित रुग्णाचा बाधित झाल्यानंतर ३० दिवसांनी मृत्यू झाल्यासही त्याची करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करावी.

एखाद्या रुग्णाचा रुग्णालयाबाहेर किंवा करोनाचे निदान झाल्याने आत्महत्या केली असल्यासही असे मृत्यू करोनामुळे झाल्याचे नोंदवावे. करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू रुग्णालयात ३० दिवसांनंतर झाल्यासही करोना मृत्यू म्हणून नोंद करावी. या मृतांच्या मृत्यूप्रमाण पत्रावर करोनामुळे मृत्यू झाल्याचे नमूद केले नसले तरी या मृतांना करोनामुळे मृत्यू झाल्याचे नोंद करून भरपाई देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार अर्जाची मंजुरी केली जात असल्यामुळे दाखल झालेल्या किंवा भरपाई दिलेल्या रुग्णांची संख्या सरकारच्या मृत्यूच्या आकेडवारीपेक्षा वाढलेली दिसून येत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण कमीच आहे, असे मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या नियमावलीनुसार राज्यातील करोना मृतांची नोंद राज्यात केली जात आहे.

करोनाच्या चाचणीमध्ये बाधित असलेल्या रुग्णाच्या मृत्यूची नोंद केली जाते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने करोना मृत्यूची संज्ञा बदलेली. त्यामुळे दाखल होणाऱ्या अर्जाची संख्या वाढणे अपेक्षितच होते. त्यातही काही अर्ज एकापेक्षा जास्त वेळा नातेवाईकांनी भरल्याचेही आढळलेले आहे. राज्यातील मृतांची आकडेवारी आणि भरपाईसाठीचे अर्ज यात सुमारे ३० टक्के तफावत असणे अपेक्षित आहे. इतर राज्यांमध्ये मात्र हे प्रमाण जास्त आहे. मृत्यूची नोंद करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाल्यामुळे हा फरक दिसून येत आहे, असे आरोग्य विभागाचे अपर सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी स्पष्ट केले आहे.

सुमारे १० हजार कुटुंबीय भरपाईपासून वंचित

भरपाईसाठी कुटुंबीयांनी दिलेल्या बँकेच्या खात्याचे क्रमांक चुकीचे असल्यामुळे सुमारे १० हजार कुटुंबीयांच्या खात्यावर भरपाईची रक्कम जमा होऊ शकलेली नाही. परंतु त्यांना ही रक्कम प्राप्त व्हावी यासाठी पुन्हा बँकेची माहिती भरण्याचा पर्याय दिला जाईल, अशी माहिती मुदत आणि पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

* सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता मृत्यू झाल्यापासून ९० दिवसांच्या आत कुटुंबीयांना भरपाईसाठी अर्ज करणे बंधनकारक असणार आहे.

* तसेच २० मार्चच्या आधी मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना पुढील ६० दिवसांमध्ये म्हणजेच जूनपर्यत भरपाईसाठी अर्ज करणेही बंधनकारक आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या