औरंगाबादेत गुढीपाडव्यात राजकीय हेवे-दावे

 


शिवसेनेच्या शोभायात्रेचं निमंत्रण भाजपनं नाकारलं

औरंगाबाद | शिवसेनेचे ढोंगी हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्राची शोभा काढणाऱ्यांनी अशा यात्राच काढू नयेत, असं वक्तव्य करत भाजपने  शिवसेनेच्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेचं निमंत्रण नाकारलंय. शनिवारी औरंगाबादेत गुढीपाडव्यानिमित्त शिवसेनेतर्फे भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेच्या पुढाकारातून हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे या समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. कोविडमुळे दोन वर्षे खंड पडलेली यात्रा काढण्यासाठी शिवसेना उत्साहात आहे. विशेष म्हणजे यंदा भाजप नेत्यांनाही या कार्यक्रमाचे नियंमत्रण देण्यात आले आहे. मात्र भाजपने या कार्यक्रमाला जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे.


शहागंज ते खडकेश्वर मंदिरापर्यंत शोभायात्रा

शुक्रवारी चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या या यात्रेविषयी माहिती दिली. ही शोभायात्रा शिवसेनेतर्फे काढण्यात येणार नसून हिंदू नववर्ष स्वागत समितीकडून काढण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपसहित सर्व हिंदूंना, संप्रदाय, संस्था, संघटना यांना देण्यात आले आहे. गोपाळ गणेश कुलकर्णी या वर्षी समितीचे अध्यक्ष आहेत. ही शोभायात्रा शहागंज, गांधी पुतळा, सराफा रोड, सिटी चौक, गुलमंडी, औरंगपुरा मार्गे खडकेश्वर मैदान अशी निघणार आहे. संध्याकाळी सहा वाता शनिसाधिका विभाश्रीदीदीजी यांच्या मार्गदर्शनाने या शोभायात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.



भाजपाची 30 फूट उंच गुढी

गुढीपाडव्यानिमित्त भाजपकडून शहरातील प्रत्येक मंडळात 30 फूट उंच गुढी उभारण्यात येणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी सांगितले. भाजप आमदार अतुल सावे म्हणाले, खैरेंकडून निमंत्रण मिळाले,मात्र गुढीपाडव्याच्या निमित्ताने उद्घाटनाचे अनेक कार्यक्रम आहेत. त्यामुळे या शोभायात्रेला जाण्यासाठी वेळ मिळणार नाही. त्यामुळे शिवसेनेच्या शोभायात्रेला भाजप नेते जाणार नसल्याची शक्यता आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या