दहावी-बारावीचा निकाल यंदा उशिरा?; उत्तरपत्रिका तपासण्यात औरंगाबाद मागे; उपसंचालकांकडून कानउघाडणी


 औरंगाबाद :
दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीच्या कामात औरंगाबाद विभागात कमालीचे शैथिल्य असून अनेक शाळा तसेच महाविद्यालयातून उत्तरपत्रिका तपासून वेळेत दिल्या नाहीत. त्यामुळे दहावी व बारावीचे निकाल उशिरा लागू शकतील. त्यामुळे या पुढे जर या कामी उशीर झाला तर मुख्याध्यापक व प्राचार्य यांच्यावर कारवाई केली जाईल अशी नोटीस शिक्षण उपसंचालकांनी बजावली आहे.


दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात या पुढे हलगर्जीपणा झाल्यास संबंधित शाळेची मंडळ मान्यता व मंडळ संकेतांक काढून घेण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आला आहे. दहावी व बारावीचे निकाल वेळेत लावण्यासाठी मुख्याध्यापक व प्राचार्यानी जातीने लक्ष घालावे अशी सूचनाही देण्यात आली आहे.


काय झाले?


औरंगाबाद वगळता अन्य विभागातील उत्तरपत्रिका तपासणीचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. औरंगाबाद विभाग मात्र खूप मागे असल्याने उपसंचालकांनी मुख्याध्यापक व प्राचार्याची कानउघाडणी केली आहे.


परिणाम काय?


करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शैक्षणिक वेळापत्रक बिघडले आहे. त्यातच यंदा परीक्षांचे निकाल उशिरा लागले, तर महाविद्यालयांमधील प्रवेशप्रक्रिया लांबू शकते. त्यामुळे निकाल नियोजित कालावधीतच लागावेत यासाठी मंडळ प्रयत्नशील असेल.


प्रत्येक विभागात परीक्षेनंतरच्या कामकाजाचा राज्य मंडळाकडून आढावा घेतला जातो. त्यात औरंगाबाद विभागाचे काम थोडेसे मागे आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचा निकालावर परिणाम होऊ दिला जाणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या