श्रीकांत शिंदे घाईने अंदमानचा दौरा आटोपून रविवारी रात्री डोंबिवलीत; मोठी राजकीय घडामोड


डोंबिवली ग्रामीण २७ गावांमधील शिवसेनेच्या २५ महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी राजीनामे दिले होते. यावरून ग्रामीण शिवसेनेत बंडखोरीचे वातावरण निर्माण झाल्याने पक्षाच्या मुंबईतील नेत्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन हा विषय तातडीने मिटविण्याचे आदेश खासदार शिंदे यांना दिले.


खासदारांनी रविवारी बैठक घेण्याचे ठरवून ग्रामीण पदाधिकाऱ्यांना निरोप दिले. ‘बैठकीला येऊ, या बैठकीत डोंबिवली शिवसेना शहराध्यक्ष राजेश मोरे अजिबात नको. शहरी भागातील एकही पदाधिकारी येथे नसावा,’ या अटीवर खासदारांसोबतच्या बैठकीला येण्याचे सेनेच्या ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी मान्य केले. खासदार श्रीकांत शिंदे अंदमानचा दौरा घाईने आटोपून रविवारी रात्री डोंबिवलीत परतले. त्यांनी शिवसेनेच्या राजीनामा दिलेल्या डोंबिवली ग्रामीण मधील २५ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यावेळी उपस्थित होते.

मोरेंचा डाव फसला

२७ गावे परिसर सेनेचा बालेकिल्ला आहे. या भागात आतापर्यंत आमदार निवडणुकीसाठी डोंबिवली, कल्याणमधील स्थानिक सेना पदाधिकाऱ्याला उमेदवारी न देता बाहेरील उमेदवार लादले जात असल्याने ग्रामीण पदाधिकाऱ्यांमध्ये पहिल्यापासून नाराजी आहे. यापूर्वी डोंबिवलीचे रमेश म्हात्रे यांनी निवडणूक लढविली. ते पराभूत झाले. आता राजेश मोरे ग्रामीण भागातून आमदारकीची निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे ग्रामीण पदाधिकाऱ्यांना समजले होते. गेल्या मंगळवारी जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी वरिष्ठांच्या सूचनेवरून ग्रामीण भाग डोंबिवली शहरी भागात विलिन करण्यात येत असल्याचे पत्र काढले. ग्रामीण सेनेचे अस्तित्व यामुळे पुसून जाणार असल्याने, पदांना काही अर्थ राहणार नसल्याने ग्रामीण २५ सेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते.


खासदार बैठक

‘गैरसमजुतीमधून काही झाले असेल तर ते मनातून दूर करा. महापालिका क्षेत्रात २७ गावे येतात म्हणून पक्ष, प्रशासकीय कामासाठी आपण शहरी, ग्रामीण अशी एकत्रित जुळवाजु‌ळव करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे जर ग्रामीण सेना पदाधिकारी नाराज असतील तर यापुढे ग्रामीण शिवसेना क्षेत्र स्वतंत्र असेल. येथील पदाधिकाऱ्यांचे यापूर्वीच पदे अधिकार कायम असतील. त्यात शहरी भागातून कोणतीही ढवळाढवळ होणार नाही. याऊलट लवकरच ग्रामीण शिवसेनेसाठी एक प्रशस्त मध्यवर्ति कार्यालय उभारणीसाठी आपण प्रयत्न करणार आहोत,’ असे आश्वासन खासदार शिंदे यांनी ग्रामीण सेना पदाधिकाऱ्यांना दिले.


खासदार भावुक

ग्रामीण पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करताना, विकास कामांवर बोलताना खासदार शिंदे भावुक झाले. निळजे गावातील रेल्वे फाटक, इतर नागरी समस्यांच्या विषयावर आपण निळजे गावाचा येत्या दोन दिवसात दौरा करू. बंद होणाऱ्या रेल्वे फाटकाचा विषय मध्य रेल्वेच्या अंतर्गत असला तरी याठिकाणी समर्पित जलदगती मालवाहू रेल्वे मार्ग कंपनीकडून दिल्ली-जेएनपीटी माल वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका टाकण्याचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत हा विषय येत असेल त्या तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून निळजे रेल्वे फाटकाचा विषय मार्गी लावू असे आश्वासन खासदार शिंदे यांनी निळजेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या