पाकिस्तानी पंतप्रधानांना शिवसेनेनं फटकारलं

 


मोदी-नवाज भेटीची आठवण करुन देत म्हणाले, “मोठ्या शरीफांच्या वेळी ‘बर्थडे डिप्लोमसी’चा…”

‘पाकिस्तान भारताशी शांतता, सौहार्दाचे व सहकार्याचे संबंध राखू इच्छितो,’’ असे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मंगळवारी स्पष्ट केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या अभिनंदन व शुभेच्छांबद्दल त्यांना धन्यवाद देताना त्यांनी हे सांगितले. शरीफ यांची पाकिस्तानचे २३ वे पंतप्रधान म्हणून पाकिस्तानी संसदेत सोमवारी बिनविरोध निवड झाली. शरीफ यांच्या शपथविधीनंतर काही मिनिटांतच पंतप्रधान मोदींनी सोमवारी त्यांचे अभिनंदन केले. पाकिस्तानच्या नवीन पंतप्रधानांनी आपल्या पहिल्याच भाषणामध्ये केलेला कश्मीरबद्दलचा उल्लेख आणि मोदींना दिलेल्या उत्तरामध्ये तफावत असल्याचं चित्र दिसत असून याच मुद्द्यावरुन शिवसेनेनं पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. तसेच शाहबाज शरीफ यांचे धाकटे बंधू नवाज शरीफ यांची पंतप्रधान मोदींनी अचानक भेट घेतल्याची आठवणही शिवसेनेनं करुन दिलीय.


..तर त्यांना कदाचित जाब विचारला असता

“पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनीही प्रथा-परंपरेनुसार ‘कश्मिरी राग’ आळवला आहे. नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या पहिल्याच भाषणात ३७० कलम रद्द केल्याचा उल्लेख केला. शिवाय हा मुद्दा प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित करू, अशी गरळही ओकली. पाकिस्तानी राज्यकर्ते असोत की लष्करशहा, त्यांची कश्मीरबाबतची आजवरची भूमिका हीच राहिली आहे. त्यामुळे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ आपल्या पूर्वसुरींपेक्षा वेगळे सूर काढतील, अशी अपेक्षा चुकीचीच ठरेल. किंबहुना, शाहबाजमियांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतरच्या पहिल्याच भाषणात कश्मीरचा उल्लेख केला नसता तर तेथील विरोधकांनी, लष्कराने, मुल्ला-मौलवींनी त्यांना कदाचित जाब विचारला असता,” असा टोला शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून लागवला आहे.

अधूनमधून त्यांना कश्मीरची उचकी लागते

“पाकिस्तानी लष्कर काय किंवा राज्यकर्ते काय, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, ‘कश्मीर प्रश्न’ हा त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा मुद्दा आहे. त्याशिवाय त्यांचा गाडा ते चालवू शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक पाकिस्तानी पंतप्रधान सत्तेत आल्यावर कश्मीर प्रश्नाची बांग देतोच देतो. इतर वेळीही अधूनमधून त्यांना कश्मीरची उचकी लागतच असते,” असंही शिवसेनेनं म्हटलंय.

कश्मीर अस्थिर ठेवणारे पाकिस्तानीच

“पाकिस्तान निर्माण झाला तेव्हापासून कश्मीरचा घास हे पाकिस्तानी राज्यकर्त्यांचे ‘स्वप्न’ राहिले आहे. त्याच्या पूर्ततेसाठी भारताविरुद्ध कधी उघड तर कधी छुपे युद्ध पाकडे नेहमीच करीत आले आहेत. दहशतवादी कारवाया घडवून कश्मीर खोरे दशकानुदशके अशांत आणि अस्थिर ठेवणारे पाकडेच आहेत. आजवर तेथे हजारो स्थानिक कश्मिरी दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडले आहेत. त्यात कश्मिरी पंडित जसे आहेत तसे स्थानिक मुस्लिमदेखील आहेत. त्याशिवाय दहशतवाद्यांच्या हल्ल्यांत आपल्या शेकडो जवानांचे बलिदान झाले आहे ते वेगळेच. ३७० कलम हटवूनही या परिस्थितीत फार फरक पडलेला नाही. पुन्हा या दहशतवाद्यांना पाकडे राज्यकर्ते उघडपणे ‘शहीद’ म्हणत असतात. त्यात कारगील घडविणारे परवेझ मुशर्रफ जसे होते तसे आता अविश्वास ठरावामुळे पायउतार होण्याची नामुष्की ओढवून घेतलेले मियां इम्रानदेखील होते,” असा उल्लेख अग्रलेखात आहे.


भविष्यातील धोरणांची जाणीव करून दिली

“पंतप्रधान मोदी यांनी ज्या नवाज शरीफ यांना अचानक लाहोरला उतरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्या नवाज शरीफ यांचेही कश्मीरबाबतचे धोरण वेगळे नव्हतेच. किंबहुना, मोदी यांच्या या कथित बर्थडे डिप्लोमसीनंतर थोड्याच दिवसांत कश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले १८ जवान शहीद झाले होते. आता त्याच नवाज शरीफ यांचे लहान भाऊ शाहबाज पाकिस्तानचे पंतप्रधान झाले आहेत आणि त्यांनी पहिल्याच भाषणात कश्मीरचा मुद्दा उकरून काढत भविष्यातील धोरणांची जाणीव करून दिली आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.


‘बर्थडे डिप्लोमसी’चा धक्का वगैरे

“एकीकडे भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत असे म्हणायचे आणि दुसरीकडे कश्मीर प्रश्नावर गरळही ओकायची. ३७० कलमाचा उल्लेख करताना चिथवणीखोर भाषा करायची. ‘कश्मीर खोऱ्यातील लोक रक्ताळलेले आहेत. त्यांना पाकिस्तान राजनैतिक आणि नैतिक पाठिंबा देईल, तसेच हा मुद्दा प्रत्येक जागतिक व्यासपीठावर उपस्थित करू’, असे तारे पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तोडले आहेत. भारताने ३७० कलम हटविले तेव्हा माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुरेसे गंभीर राजनैतिक प्रयत्न केले नाहीत, असाही ठपका शाहबाज यांनी ठेवला आहे. कश्मीर प्रश्नावर पाकिस्तानचे नवे सरकार अधिक आक्रमक असणार, याचेच हे संकेत आहेत. मोठ्या शरीफांच्या वेळी ‘बर्थडे डिप्लोमसी’चा धक्का वगैरे देणारे आता या छोटय़ा शरीफांच्या मुक्ताफळांबाबत कोणती ‘डिप्लोमसी’ अवलंबणार आहेत?,” असा प्रश्न शिवसेनेनं भारताचं धोरण नवीन पाकिस्तानी पंतप्रधानांबद्दल काय असेल याबद्दल उपस्थित केलाय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या