हा हल्ला म्हणजे मला राजकारणातून संपविण्याचा कट: शंकरराव गडाख


सोनई
 :  राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर काल  शुक्रवारी, जीवघेणा हल्ला झाला. हल्ल्यातील सूत्रधार हा भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे  यांचा कार्यकर्ता असल्याची चर्चा नेवासे तालुक्यात आहे. या संदर्भात मंत्री शंकरराव गडाख यांनी विरोधकांवर टीका केली आहे. 

काल शुक्रवारी, रात्री 9.45 वाजता घोडेगाव-लोहगाव रस्त्यावर अज्ञात हल्लेखोरांनी मंत्री गडाखांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर गावठी पिस्तुलातून पाच गोळ्या झाडल्या होत्या. पैकी दोन गोळ्या कमरेच्या खाली लागल्या होत्या. जखमी राहुल राजळे यांचे बंधू विकास राजळे यांच्या फिर्यादीवरून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंत्री गडाख म्हणाले, स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने झालेला हल्ला माझे राजकारण संपविण्यासाठीच केला आहे. नेवासे तालुक्यातील राजकीय विरोधकांनी हा हल्ला एक प्रकारे माझ्यावरच केला आहे.


मंत्री गडाख पुढे म्हणाले, की नेवासे तालुक्यातील स्थानिक विरोधकांनी राजकीय षडयंत्र रचून मला राजकारणातून संपविण्याचा जणू विडाच उचलला आहे. अनेक दिवसांपासून खालच्या पातळीवर आरोप, शिवराळ भाषणे, खोट्या, नाट्या केसेस दाखल केल्या. आता तर माझ्या स्वीय सहाय्यकावर खुनी हल्ला करण्यात आला आहे, असे सांगून माझा पोलिस यंत्रणा, न्यायदेवता व जनता जनार्धनावर विश्वास आहे. या घटनेतून लवकरच सत्य बाहेर येईल, असा विश्वास गडाख यांनी आपल्या प्रतिक्रियेत व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या