अजित पवार यांची ‘साखरपेरणी’; बीडमध्ये जिल्हाध्यक्षपदावरून हटविल्यानंतरही बजरंग सोनवणे यांना बळ

 



 भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रशासकीय कौशल्यावर थेट टीका करत अजित पवारांनी बीडमध्ये जिल्हाध्यक्ष पदावरून हटविलेल्या बजरंग सोनवणेंना बळ देण्यात पक्षहित असल्याचा संदेश पक्षातील वरिष्ठ नेत्यांना दिला आणि पुन्हा एकदा ‘साखर पेरणी‘च्या राजकारणाला बळ दिले. 


वैद्यनाथ साखर कारखान्यांची अवस्था काय झाली आहे, असा सवाल करत साखर कारखाना चालविणे सोपे काम नाही. असे ते म्हणाले. साखर कारखाना चालविण्यात पंकजा मुंडे अयशस्वी ठरल्या हे अधोरेखित करताना राष्ट्रवादीचा कार्यकर्ता साखर पेरणीत कसा पुढे असतो हे नुकतेच बीडमध्ये सांगितले. मराठवाडय़ातील अतिरिक्त उसाचा प्रश्न राजकीयदृष्टय़ा ऐरणीवर येण्याची शक्यता असल्याने आता बीड राष्ट्रवादीमध्ये आपले लक्ष असल्याचा संदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांना मानणारा एक स्वतंत्र गट कायमस्वरूपी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या ऐवजी नवा जिल्हाध्यक्ष नेमल्यानंतर सोनवणेंच्या राजकीय पुनर्वसनाचे प्रश्न चर्चेत येऊ लागले होते. केज नगर पंचायतीमध्ये बजरंग सोनवणे यांच्या मुलीचा पराभव झाला. या पराभवास राष्ट्रवादीतील एक गट कारणीभूत असल्याचा आक्षेप घेतला जात होता. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत सोनवणे यांचे संबंध तसे ताणलेले होते. या राष्ट्रवादी काँग्रेसमधील चर्चेमुळे बजरंग सोनवणे यांच्या ऐवजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद बदलले जाईल, याची चर्चा वर्षभरापासून बीडमध्ये होती. घडलेही तसेच. सोनवणे यांचा कार्यकाळ संपल्याने नवा अध्यक्ष देण्यात आला असे अधिकृत सांगण्यात येत असले तरी या राजकीय पार्श्वभूमीकडेही लक्ष वेधले जाते. 


बजरंग सोनवणे यांनी केज तालुक्यातील उभा केलेला येडेश्वरी साखर कारखाना सुरू करुन तो नीटपणे चालविला. हा कारखाना उभा करण्यासाठी पुणे जिल्हा बँकेकडून सहकार्य करण्यात आले होते. त्यामुळे अजित पवार हे सोनवणे यांचे नेते. कारखान्यातील आसवानी प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अजित पवार यांच्या उपस्थितीमुळे बीड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोनवणे यांना बळ देण्यात आल्याचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. सोनवणे यांना बळ देताना भाजपच्या नव्या पिढीतील नेतृत्वाला साखर कारखाना नीट चालविता येत नाही, असा संदेश मात्र आवर्जून देण्यात आला. वैद्यनाथ साखर कारखान्यातील कामगारांना वेतनासाठी आंदोलन करावे लागले. कारखान्याच्या आर्थिक स्थितीबाबत विरोधक व शेतकरी सभासद यांच्यामध्ये संभ्रम आहे. त्यामुळे वैद्यनाथच्या कारभारावरुन अजित पवार यांनी पंकजा मुंडे यांच्यावरही नाव न घेता टीका केली. लातूरवरून येताना चारपदरी रस्ते व बीडमध्ये ते दुपदरी रस्ते. रस्त्यांसाठी निधी आणण्यात खासदार कमी पडल्या अशी टीका त्यांनी केली. या निमित्ताने मराठवाडय़ातील अतिरिक्त उसाच्या प्रश्नावरही त्यांनी तोडगा काढण्यासाठी वाहतूक अनुदान व साखर उतारा अनुदान दिले जाईल असे सांगितले. पुढील काळात कारखाने चालविताना ही अनुदाने मिळणे आवश्यक असल्याची मागणी अलीकडेच मराठवाडय़ातील खासगी कारखानदारांनी सरकारकडे केली होती. आता ऊस प्रश्नाचे राजकारण होण्याची शक्यता दिसत असल्याने कार्यकर्त्यांना बळ देण्याचे जुने सूत्र अजित पवार पुन्हा जपताना दिसू लागले आहेत.


एखाद्याला काढला म्हणजे काय झालं?


 एखाद्या कार्यकर्त्यांला काढलं म्हणजे काय त्याच्या पाठीमागे कोणी नसते असं काही नसतं. बजरंग सोनवणे यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून चांगले काम केले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षही त्यांच्यावर वेगळी जबाबदारी देण्याच्या मानसिकतेत आहेत, असेही पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. केवळ बीडच नाही तर मराठवाडय़ातील अतिरिक्त ऊस प्रश्नी अनुदानाची मदत करण्याचेही आश्वासन त्यांनी दिल्याने साखर पेरणीला सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या