श्रीलंकेवर अभूतपूर्व संकट, देशाच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा; जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईमुळे रस्त्यांवर आक्रोश

 


श्रीलंका आतापर्यंतच्या सर्वात भीषण आर्थिक संकटाला सामोरं जात असतानाच हे संकट दिवसेंदिवस गहिरं होत चाललं आहे. श्रीलंका सरकारमधील सर्वच्या सर्व २६ मंत्र्यांनी आपला राजीनामा दिला आहे. एकीकडे सर्व मंत्रिमंडळाने राजीनामा दिलेला असताना महिंदा राजपक्षे मात्र पंतप्रधानपदी कायम आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त फेटाळण्यात आलं आहे.


देशावर सध्या असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीमुळे पंतप्रधान राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु झाली. दरम्यान या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाचे निर्णय घेतली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

श्रीलंकेचे शिक्षणमंत्री दिनेश गुणवर्धने यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान वगळता देशाच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रविवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर राजीनामा देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


श्रीलंकेचे क्रीडा मंत्री नमल राजपक्षे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपण राष्ट्रपतींच्या सचिवांना राजीनामा दिल्याची माहिती दिल्याचं सांगितलं आहे.

श्रीलंकेचे माजी मंत्री विमल यांनीही राष्ट्रपतींची भेट घेतली आणि देशावर असलेल्या संकटाचे निराकरण करण्यासाठी सर्वपक्षीय अंतरिम सरकार नियुक्त करण्याचा प्रस्ताव दिला.


६०० नागरिक अटकेत

३६ तासांच्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल आणि सरकारविरोधी मेळावा आयोजित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल देशाच्या पश्चिम प्रांतात रविवारी ६०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली. रविवारी होणाऱ्या या नियोजित आंदोलनापूर्वी, आठवडाअखेर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा भंग करून, आपले नेते साजित प्रेमदासा यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाचे खासदार शनिवारी कोलंबोतील ‘स्वातंत्र्य चौकाकडे’ निघाले होते.


देशातील सध्याचे आर्थिक संकट आणि जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईमुळे लोकांना सोसावा लागणारा त्रास यांच्या विरोधात समाजमाध्यम कार्यकर्त्यांनी ही निदर्शने आयोजित केली होती.


समाजमाध्यमांवर १५ तास बंदी

अभूतपूर्व आर्थिक संकटाला तोंड देणाऱ्या श्रीलंकेत आयोजित करण्यात आलेल्या सरकारविरोधी मिरवणुकीपूर्वी सरकारने देशव्यापी आणीबाणी जाहीर करून ३६ तासांची संचारबंदी लागू केली होती. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक व इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर बंदीही लागू केली, मात्र रविवारी ती मागे घेतली.


फेसबुक, ट्विटर, यूटय़ूब, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हॉट्सअ‍ॅप, व्हायबर, टेलिग्राम व फेसबुक मेसेंजर यांच्या सेवा १५ तासांनंतर पुन्हा सुरळीत करण्यात आल्या, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या सर्व सेवा पूर्णपणे किंवा आंशिक स्वरूपात बंद करण्यात आल्या होत्या. एकीकडे दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित असतानाच, अन्न, जीवनावश्यक वस्तू, इंधन आणि औषधे यांच्या टंचाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा निषेध करण्यासाठी कोलंबोत एकत्र येण्याचे लोकांनी ठरवले होते. हे रोखण्यासाठी समाजमाध्यमांवर बंदी घालण्यात आली, असे वृत्त ‘दि कोलंबो पेज’ वृत्तपत्राने दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या