अजय देवगणच्या टीकेनंतर किच्चा सुदीपचे प्रत्युत्तर


 “मला अजिबात लाज वाटत नाही…”

दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप हा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही, असे वक्तव्य दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप याने केले होते. त्याच्या या विधानामुळे एक वेगळाच वाद निर्माण झाला होता. यावर सिनेसृष्टीतून विविध प्रतिक्रिया येत होत्या. किच्चा सुदीपच्या या वक्तव्यावर बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने संतप्त प्रतिक्रिया दिली होती. ‘हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि नेहमीच असेल’, असे अजय देवगणने ठणकावून सांगितले होते. त्यानंतर आता किच्चा सुदीपने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.


किच्चा सुदीपचे स्पष्टीकरण

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या प्रत्युत्तरानंतर किच्चा सुदीपने सलग तीन ट्विट करत यावर त्याचे मत मांडले. यातील पहिल्या ट्विटमध्ये तो म्हणाला, “सर, मी ज्या संदर्भात हे वक्तव्य केले होते, तो मुद्दा तुम्ही अगदी वेगळ्या पद्धतीने घेतला आहे. कदाचित मी तुम्हाला भेटल्यावर माझा संपूर्ण मुद्दा तुमच्यासमोर अधिक चांगल्या पद्धतीने मांडू शकेन. मला असे बोलायचे नव्हते. कोणाच्याही भावना दुखावणे, कोणत्याही वादाला तोंड फोडणे किंवा त्याला प्रोत्साहन देणे, मी हे असे का करेन सर.”

“मी माझ्या देशातील प्रत्येक भाषेचा आदर करतो. मला हा विषय अजून पुढे वाढवायचा नाही. मला असे वाटतं की हा विषय आताच संपायला हवा. मी मघाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या बोलण्याचा हे उद्दिष्ट नव्हते, जे सध्या समजलं जात आहे. तुम्हाला खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा. मी तुम्हाला लवकरच भेटेन, अशी आशा व्यक्त करतो.”


“सर अजय देवगण, तुम्ही जो हिंदी मजकूर पाठवला आहे, तो मला समजला आहे. याचे कारण म्हणजे आपण सर्वजण हिंदीचा आदर करतो. त्यावर प्रेम करतो आणि आम्ही ही भाषाही शिकत आहोत. याची अजिबात लाज वाटत नाही सर. पण मी फक्त हाच विचार करत आहे की मी हेच ट्विट जर कन्नड भाषेत केले असते, तर काय झाले असते. सर आपण सगळे भारताचे आहोत ना?” असे किच्चा सुदीपने म्हटले.

किच्चा सुदीपच्या या स्पष्टीकरणानंतर अजय देवगणने त्यावर पुन्हा एक ट्विट केले आहे. त्यावर तो म्हणाला, “हॅलो किच्चा सुदीप. तू माझा मित्र आहेस. माझा गैरसमज दूर करण्यासाठी तुझे खूप खूप आभार. मी नेहमी सर्वच सिनेसृष्टीला एक म्हणून पाहिले आहे. आपण सर्वच प्रत्येक भाषेचा आदर करतो आणि प्रत्येकाने आपल्या भाषेचा आदर करावा अशी अपेक्षा करतो. कदाचित, तुझ्या वक्तव्याचे भाषांतर करताना काही तरी चुकले असावे.”


यावर किच्चा सुदीप म्हणाला की, “एखाद्या वक्तव्याचे भाषांतर करणे आणि त्याचा अर्थ लावणे हा एक वेगळा दृष्टीकोन आहे. त्यामुळे मी कोणत्याही गोष्टीचे कारण जाणून घेतल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देत नाही. कारण ते प्रकरण नेमकं काय आहे, यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. अजय देवगण सर, मी तुम्हाला याबद्दल दोष देत नाही. पण जर तुम्ही माझ्या एखाद्याचा चांगल्या गोष्टीचे कौतुक केले असते तर तो माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण ठरला असता”, असा टोला त्याने लगावला.

नेमकं प्रकरण काय?

दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपने या चित्रपटाच्या लाँचिंगला हजेरी लावली होती. यावेळी त्याने हिंदी भाषेवर एक वक्तव्य केले होते. “सध्या दक्षिणेत अनेक चित्रपटांची निर्मिती होत आहे, असे तुम्ही काही वेळापूर्वी म्हणालात. पण मला त्यात एक छोटीशी दुरुस्ती करायची आहे. हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. तर सध्या संपूर्ण सिनेसृष्टी ही विविध भाषांवर चित्रपटांची निर्मिती करताना दिसत आहे. अनेक बॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक तेलुगू, तामिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्यांना त्यातून हवे तितके यश मिळत नाही आणि त्याउलट आज आम्ही सर्वत्र चालणारे चित्रपट बनवत आहोत”, असे दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपने म्हटले होते.


त्यावर अजय देवगणने ट्विट करत प्रत्युत्तर दिले होते. “किच्चा सुदीप…, जर तुमच्या मते हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, तर मग तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का प्रदर्शित करता? हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि नेहमीच असेल. जन गण मन”, असे ट्विट अजय देवगण याने केले होते. या संपूर्ण प्रकरणाच्या वादानंतर किच्चा सुदीप आणि अजय देवगणमध्ये ट्विटर वॉर रंगल्याचे पाहायला मिळाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या