पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याआधीच शाहबाझ शरीफ काश्मीरबद्दल बरळले; म्हणे “भारतासोबत शांततापूर्ण संबंध हवेत पण…”



पाकिस्तानमधील सत्तापालट निश्चित झाल्यानंतर विरोधी आघाडीच्या संयुक्त बैठकीत शाहबाझ शरीफ यांचे नाव पंतप्रधान पदासाठी निश्चित करण्यात आल्यानंतर त्यांनी पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केलाय. आज पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र शाहबाझ शरीफ यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आणि पंतप्रधानपदी विराजमान होण्याआधीच भारताविरोधात गरज ओकली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरुन शाहबाझ शरीफ यांनी वक्तव्य केलं असून त्यांच्या या वक्तव्यावरुन नवीन पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत पाकिस्तान संबंध चिघळतील की काय अशी शक्यता व्यक्त होऊ लागलीय.


नवीन पर्व सुरु करणार…

इस्लामाबादमध्ये जीओ न्यूजशी बोलताना शहाबाझ शरीफ यांनी पाकिस्तानमधील नवीन मंत्रीमंडळ हे विरोधी पक्षांना विश्वास घेऊन तयार केलं जाईल असं म्हटलं आहे. “मी देशात नवीन पर्व सुरु करणार असून यात सर्वांना एकमेकांबद्दल अधिक विश्वास असेल,” असं शाहबाझ शरीफ म्हणालेत. देशाच्या आर्थिक परिस्थितीत अधिक सुधारणा करुन लोकांना मोठा दिलासा देणार असल्याचंही शाहबाझ शरीफ म्हणालेत.

काश्मीरबद्दल काय म्हणाले?

याच वेळेस त्यांना धोरणांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी, “माझे पहिले प्राधान्य हे देशात सुसंवाद साधण्याला आहे,” असं सांगितलं. तसेच पुढे बोलताना, “आम्हाला भारतासोबतही शांततापूर्ण आणि चांगले संबंध हवे आहेत. मात्र भारतासोबतचे शांततापूर्ण संबंध हे काश्मीर प्रश्नावर तोडगा निघाल्याशिवाय शक्य नाहीत,” असं वक्तव्य पंतप्रधान पदाचे उमेदवार असणाऱ्या पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ पक्षाचे (पीएमएल-एन) अध्यक्षांनी केलंय.


भावाबद्दल काय म्हणाले?

शाहबाझ यांचे ज्येष्ठ बंधू असणाऱ्या नवाज शरीफ यांचं राजकारणामध्ये पु:रागमन होणार का तसेच त्यांच्या खटल्यासंदर्भात विचारण्यात आलं असता होऊ घातलेल्या पंतप्रधानांनी हे प्रकरण कायद्याने हाताळलं जाईल असं म्हटलंय.


पंतप्रधानपदावरुन पायउतार…

गेल्या काही दिवसांतील नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर पाकिस्तानात रविवारी सत्तापालटावर शिक्कामोर्तब झाले. अविश्वास ठराव मंजूर झाल्याने पंतप्रधानपदावरून पायउतार झालेल्या इम्रान खान यांनी, आपल्या समर्थकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करीत पुन्हा स्वातंत्र्याचा लढा सुरू झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.  


कोण आहेत शाहबाझ?

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची निवडणूक आज, सोमवारी होत आहे. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) सहअध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी विरोधी आघाडीच्या संयुक्त बैठकीत शाहबाझ यांचे पंतप्रधानपदासाठी नाव सुचवले. शाहबाझ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत.


आज नेतानिवड प्रक्रिया सुरु…

पंतप्रधानपदावरून गच्छंतीनंतर इम्रान यांनी आपल्या समर्थकांना परकीय शक्तींच्या ‘आयात सरकार’चा विरोध करण्यासाठी आपल्यासह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन केले. अविश्वास ठराव मंजूर होऊन पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागलेले इम्रान खान हे पाकिस्तानच्या इतिहासातील पहिले पंतप्रधान ठरले. त्यांच्या गच्छंतीनंतर रविवारी पाकिस्तानी संसदेच्या नेतानिवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.


इतर उमेदवार कोण…

विरोधी आघाडीमध्ये समाजवादी, उदारमतवादी आणि कट्टर धार्मिक पक्षांचा समावेश आहे. त्यांनी शाहबाझ शरीफ यांचे पंतप्रधानपदासाठी नामांकन केले आहे. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षातर्फे माजी परराष्ट्रमंत्री शाह मसूद कुरेशी यांचे पंतप्रधानपदासाठी नामांकन करण्यात आले आहे.


कोणावरही अन्याय होणार नाही…

पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी शाहबाझ यांनी संसदेला संबोधित करताना राज्यघटनेला भक्कम पािठबा देणाऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, मला भूतकाळातील कटू स्मृतींना उजाळा द्यायचा नाही. आपल्याला त्या विसरून पुढे वाटचाल करायची आहे. आपण सुडाचे राजकारण करणार नाही अथवा कुणावर अन्यायही करणार नाही. आपण विनाकारण कुणालाही तुरुंगात टाकणार नाही. कायद्यानुसार सर्व कारवाई होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या