Breaking News

‘पुष्पा’, ‘RRR’ आणि ‘KGF2’ सारखे दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट, मग ‘राधे श्याम’ का ठरला फ्लॉप? प्रभासने दिले स्पष्टीकरण


दक्षिणात्य सुपरस्टार बाहुबली म्हणजेच प्रभास हा नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी प्रभासचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करता आली नाही. एकीकडे देशात पुष्पा, RRR आणि KGF2 यासारखे अनेक दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट ठरत आहे. तर दुसरीकडे प्रभासचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. त्यामुळे विविध चर्चा सुरु होत्या. नुकतंच सुपरस्टार प्रभासने याबाबत मौन सोडत भाष्य केले आहे.

नुकतंच प्रभासने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत याबाबत सांगितले आहे. यावेळी त्याला ‘राधे श्याम’ या चित्रपटाबद्दल विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला, “कदाचित माझा ‘राधे श्याम’ हा चित्रपट प्रेक्षकांना तितका आवडला नसावा. एसएस राजामौली यांनी मला बाहुबलीद्वारे लार्जर दॅन लाइफ इमेज दिली आहे. कदाचित आताही काही लोकांना मला फक्त त्या भूमिकेत बघायचे असावे.”

“पण मला अजूनही विश्वास आहे की, जेव्हा ते कुटुंबासह टीव्हीवर राधे श्याम हा चित्रपट पाहतील, तेव्हा लोकांना ते नक्की आवडेल. कारण करोना काळात अनेक लोक टीव्ही आणि ओटीटीवर बऱ्याच गोष्टी पाहायला शिकले आहेत. बाहुबली चित्रपटामुळे माझे दिग्दर्शक, निर्माते यांच्यावर एक वेगळा दबाव आहे. पण कदाचित करोनामुळे किंवा स्क्रिप्टमधील काही अभावामुळे हा चित्रपट लोकांच्या हृदयाला स्पर्श करू शकला नाही. तसेच कदाचित लोकांना मला अशा पात्रात बघायचे नसेल”, असेही त्याने म्हटले.

‘राधे श्याम’ या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हा बहुभाषिक चित्रपट असून टी-सीरिज यांची प्रस्तुती आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. यूव्ही क्रिएशन्सने तयार केलेल्या या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे. तर हा चित्रपट तमिळ, मल्याळम, तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषेत ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला.

‘तू लग्न कधी करणार?’ या प्रश्नावर उत्तर देताना अभिनेता प्रभास म्हणाला, “जेव्हा माझ्याकडे…”

दरम्यान प्रभास लवकरच ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यासोबतच प्रभास हा ‘सलार’ आणि ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटांमध्येही काम करत आहे.

No comments