कॉमेडियन भारती सिंहविरोधात तक्रार दाखल, दाढी-मिशीवरुन विनोद करणं पडलं महागात


टीव्ही क्षेत्रातील सर्वात पहिली महिला कॉमेडियन म्हणून भारती सिंह ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून भारती सिंहचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तिने कॉमेडी करतेवेळी दाढी-मिशीबद्दल खिल्ली उडवली होती. मात्र तिला हा विनोद करणे महागात पडले आहे. या प्रकरणी तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भारती सिंहने एका कॉमेडी शो दरम्यान दाढी आणि मिशांबद्दल अनेक गोष्टी वक्तव्य केले होते. यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या. तिच्याविरोधात अमृतसरमध्ये निदर्शने करण्यात आली. तसेच याप्रकरणी तिच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. अखेर भारती सिंहविरोधात आयपीसी कलम २९५-ए अंतर्गत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला आहे.

शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती सिंहच्या या विनोदामुळे शीख समुदायातील लोक संतप्त झाले आहेत. या विनोदामुळे अनेक लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. याप्रकरणी शीख समुदायाकडून वाढता दबाव लक्षात घेता भारती सिंहने माफी मागितली आहे.

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जॅस्मिन भसीन भारतीच्या कॉमेडी शोमध्ये पाहुणी कलाकार म्हणून दिसली होती. या शोमध्ये भारतीने गंमतीत दाढी-मिशी का नसावी? असा प्रश्न विचारला होता. यावेळी ती म्हणाली होती की, दूध पिता पिता तोंडात दाढी आली तर शेवयांची चव येते. तर माझे अनेक मित्र आहेत, ज्यांचे नुकंतच लग्न झाले आहे. ते दिवसभर दाढी-मिशीतील उवा काढण्यातच दिवस घालवतात, असे भारती गंमतीत म्हणाली होती. तिच्या या विनोदानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली होती.

यानंतर भारती सिंहने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत याप्रकरणी माफी मागितली होती. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात मी दाढी मिशी वरुन गंमत केली आहे. पण मी कोणत्याही धर्माचा किंवा जातीबद्दल वक्तव्य केलेले नाही. तुम्हीही हा व्हिडीओ पाहा आणि त्यात मी कोणालाही या धर्माचे लोक दाढी ठेवतात वैगरे असे म्हटलेले नाही. पण माझ्या या गंमतीवर जर कोणी दुखावले असेल तर मी हात जोडून त्यांची माफी मागते. माझा स्वत:चा पंजाबमधील अमृतसरमध्ये जन्म झाला आहे. त्यामुळे मी तुमचा मान नक्की ठेवते, असे तिने या व्हिडीओत म्हटले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या