“…त्यामुळेच शरद पवारांना कायम भावी पंतप्रधान म्हणून हिणवलं जातं”; राज ठाकरेंच्या रद्द झालेल्या दौऱ्यावरुन मनसेचा हल्लाबोल


राज ठाकरेंचे सचिव सचिन मोरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचे फोटो मंगळवारी सोशल नेटवर्किंगवर शेअर केले. या फोटोंच्या माध्यमातून मनसेने शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत रसद पुरवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा आरोप केला होता. आता याच प्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी शरद पवारांवर निशाणा साधत महाराष्ट्र त्यांना यापुढेही भावी पंतप्रधान म्हणून हिणवत राहील अशा शब्दांमध्ये टीका केलीय.

नेमकं फोटो प्रकरण काय?

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी याआधी शऱद पवारांनीच राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला रसद पुरवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता मनसेकडून शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोत बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. हे फोटो नेमके कधीचे आहेत याचा उल्लेख यामध्ये केलेला नाही. मात्र मागे असलेल्या बॅनरवरुन हा कुस्तीचा कार्यक्रम असून मावळमध्ये झाल्याचं दिसत आहे. राज ठाकरेंचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकला हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी “कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है” असं म्हटलं आहे.

“या पुढेही शरद पवारांना भावी प्रंतप्रधान म्हणून हिणवलं जाणार”

याच प्रकरणावरुन मसनेचे प्रवक्ते असणाऱ्या चिले यांनी शरद पवारांवर टीका केलीय. “एक आस्तिक हिंदूला एका नास्तिक हिंदूने श्रीरामाचं दर्शन घेण्यापासून कसं रोखलं हे गेल्या काही दिवसात संपूर्ण देशाने पाहिले,” असं चिले यांनी प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओत म्हटलंय. तसेच पुढे बोलताना चिले यांनी, “शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे मधूर संबंध आता काही लपलेले नाहीत. शरद पवारांची विश्वासार्हता महाराष्ट्रात संपण्याचं हेच कारण आहे,” अशीही टीका केलीय.

“पवारांची विश्वासार्हता संपल्यामुळेच महाराष्ट्रात त्यांना कायमच भावी पंतप्रधान म्हणून हिणवलं जातं. यापुढे देखील महाराष्ट्र त्यांना भावी पंतप्रधान म्हणून हिणवेल. ते पंतप्रधान बनू शकणार नाहीत. शरद पवारांनी त्यांच्या याच करामतीमुळे त्यांची विश्वासार्हता महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात गमावलीय,” असंही चिले यांनी पवारांवर टीका करताना म्हटलंय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या