Breaking News

हैदराबादचे विजयपथावर परतण्याचे लक्ष्य!; आजच्या सामन्यात गुणतालिकेतील तळाच्या मुंबईचे आव्हान


 मुंबई :
गेल्या सलग पाच सामन्यांत पराभव पत्करणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद संघापुढे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)क्रिकेटमध्ये मंगळवारी गुणतालिकेत तळाला असलेल्या मुंबई इंडियन्सचे आव्हान असेल. बाद फेरीतील प्रवेशाच्या आशा कायम राखण्यासाठी हैदराबादला  विजय अनिवार्य आहे. हैदराबादच्या संघाची गुणतालिकेत आठव्या स्थानी घसरण झाली आहे. बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही साखळी सामने जिंकावे लागणार असून अन्य संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल.

हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनला १२ सामन्यांत १८.९२च्या सरासरीने केवळ २०८ धावा करता आल्या आहेत. मात्र प्रशिक्षक टॉम मूडी यांनी कर्णधाराची पाठराखण केली आहे. त्याचा सलामीचा साथीदार अभिषेक शर्मा आणि एडिन मार्करम सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी. नटराजन, मार्को यान्सेन या चौकडीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

तिलक, बुमरावर भिस्त

कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन या मुंबईच्या सलामीवीरांना यंदा अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. जायबंदी सूर्यकुमार यादव स्पर्धेबाहेर झाल्यामुळे मुंबईच्या मधल्या फळीची भिस्त युवा डावखुरा फलंदाज तिलक वर्मावर आहे. त्याने यंदा मुंबईकडून सर्वाधिक ३६८ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत डॅनियल सॅम्स, रायली मेरेडिच आणि कुमार कार्तिकेय चांगली कामगिरी करत आहेत. मात्र मुंबईचा संघ बळींसाठी प्रामुख्याने जसप्रीत बुमरावर अवलंबून आहे.


वेळ : सायं. ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्यांवर)

No comments