Breaking News

आम्ही शिवसैनिक, आमची अक्कल गुडघ्यात, काहीतरी करू शकतो'; खैरेंचा नवनीत राणांना इशारा


बीड :
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना आव्हान देणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी त्यांचा एकेरी उल्लेख करत टीकेचे प्रहार केले आहेत. रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्यानंतर नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत त्यांना आव्हान दिले होते. राणा यांच्या वक्तव्यावर शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनी तीव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना नेते खैरे यांनीही, 'आम्ही सरळ जाऊन काहीतरी करू शकतो', अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला खैरे आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. या बैठकीनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना खैरे यांनी राणा यांच्यावर निशाणा साधला. राणा यांचा एकेरी उल्लेख करत खैरे म्हणाले, 'नवनीत राणांबद्दल मी काही बोलतच नाही. कारण मी काही बोललो तर ते व्हायरल होईल. मला त्या बाईचा इतका राग आलेला आहे. त्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काहीही बोलतात. आणि ते राणा देखील. आम्ही शिवसैनिक, आमच्या डोक्यात एक वेगळी अक्कल असते. किंवा आमची अक्कल गुडघ्यामध्ये असते. आम्ही जाऊन सरळ काहीतरी करू शकतो. कारण आम्हाला हे सहन होत नाही. आमचे ते दैवत आहेत. आमचे ते प्रमुख आहेत. आणि काहीही बोलायचे म्हणजे काय, कोण सहन करेल?'

खैरे पुढे नवनीत राणा यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले, 'त्या बाई काय होत्या, कसे काय हे मला सगळे माहीत आहे. जातीचे सर्टिफिकेट खोटे आणले. आता भारतीय जनता पक्षाचा सपोर्ट आहे. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सपोर्ट केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीत आला, तर त्या तिकडे गेल्या. पक्ष बदलणाऱ्या त्या बाई आहेत.'

देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता साधला निशाणा

सध्या राजकारणाची पातळी मोठ्या प्रमाणात घसरली आहे. आमचे जुने मित्र आहेत माजी मुख्यमंत्री. ते फक्त मोठमोठ्याने भाषण करत असतात. ते बुद्धीवादी आहेत का? मी सांगतो शांत राहा ना जरा. उद्धव ठाकरे यांना शांतपणे काम करू द्या. उद्धव ठाकरे हे शांतपणे काम करत आहेत. ते इकडे लक्षच देत नाहीत. ते जनतेची सेवा करत आहेत. महाराष्ट्र क्रमांक १ वर आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांचा आहे. मात्र, अनेकजण तिथे खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

No comments