आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा करोनाबाबत मोठा दिलासा:


 “रुग्णसंख्या वाढतेय, पण…!”

गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रासह जगभरात थैमान घालणाऱ्या करोनावर वाढत्या लसीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यात जगभरातल्या अनेक देशांना यश आल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर इतर देश आणि राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात देखील काही दिवसांपूर्वी करोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले. मात्र, या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या धिम्या गतीने का होईना, वाढू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा करोनाचं तेच भीषण रूप दिसणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलासादायक विधान केलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.


चौथ्या लाटेची व्यक्त केली होती भीती

दोनच दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना करोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली होती. “जून, जुलैमध्ये करोनाची चौथी लाट जास्त जीवघेणी ठरत असल्याचं वाटलं तर लसीकरणच तारणहार असणार आहे. लसीकरणाचं प्रमाण वाढवणं महाराष्ट्रासमोर महत्वाचं काम असणार आहे. आरोग्य विभाग याबाबतीत अत्यंत सजग आणि जागरुक राहून लसीकरणाचं काम करत आहे,” असं राजेश टोपे म्हणाले होते.

दरम्यान, यासंदर्भात आज टोपेंनी दिलासादायक स्पष्टीकरण दिलं आहे. “मास्कबाबतचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. एक नक्की आहे की १००-१२५ संख्येनं आज रुग्णसंख्या वाढतेय. पण ते फारसं भीतीदायक किंवा गंभीर नाहीये. कुठल्याही परिस्थितीत हा घाबरून जाण्याचा विषय नाही”, असं राजेश टोपे म्हणाले.

इतर आरोग्यमंत्र्यांशी केली चर्चा

दरम्यान, ज्या राज्यांमध्ये करोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे, अशा राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी आपण चर्चा केल्याचं राजेश टोपे यावेळी म्हणाले. “मी गुजरातला होतो. ज्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतेय, तिथल्या आरोग्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा केली. त्यांचं म्हणणं आहे की रुग्ण वाढत आहेत हे खरंय. पण अतिशय सौम्य स्वरुपाचा परिणाम रुग्णांवर आहे. रुग्णालयात दाखल होण्याचं मोठं प्रमाण दिसत नाही. गृह विलगीकरणातच रुग्ण बरे होत आहेत”, असं टोपे म्हणाले.


“तशी घाबरण्याची परिस्थिती नक्की नाही. आपल्याकडे तेवढी परिस्थिती देखील गंभीर नाही. आपल्याला सगळं बंद करून चालणार नाही, पण थोडी सतर्कता सगळ्यांनी ठेवली पाहिजे”, असं देखील त्यांनी नमूद केलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या