“खंत फक्त एकाच गोष्टीची वाटते की महाराष्ट्राची…”, भाजपाच्या भूमिकेवर आमदार रोहित पवारांचं टीकास्त्र!


राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. कोणत्या पक्षाचे आमदार कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला आपलं मत देणार? यावरून जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे. दुपारी १२.३० पर्यंत २३८ आमदारांनी मतदान केलं. राज्यातील ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणार असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. त्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आमदारांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवण्यापासून त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवणे, मतदार आमदारांचा स्पष्ट आकडा जाहीर न करणे अशा अनेक गोष्टी महाराष्ट्रात घडताना दिसून आल्या. या पार्श्वभूमीवर आज मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात निवडणूक बिनविरोध होण्यासंदर्भातली चर्चा निष्फळ ठरल्यामुळे ही निवडणूक होत आहे. एकीकडे महाविकास आघाडीकडून आपल्या उमेदवाराला भाजपानं पाठिंबा द्यावा, विधानपरिषदेसाठी तुमच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ असा प्रस्ताव ठेवलेला असताना भाजपानं याच्याउलट प्रस्ताव ठेवत आत्ता भाजपाच्या उमेदवाराला राज्यसभेसाठी पाठिंबा देण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंनी प्रस्ताव अमान्य झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं.

संभाजीराजेंनाच उमेदवारी का दिली नाही?

मात्र, या गोष्टीसाठी दोन्ही बाजू एकमेकांना जबाबदार धरत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी देखील भाजपाला लक्ष्य केलं आहे. “ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलत होते (संभाजीराजे छत्रपती), त्याच व्यक्तीला तुम्ही उमेदवारी का दिली नाही? त्यामुळे त्यांची रणनीती ठरली होती. त्या पद्धतीने त्यांच्याच पक्षाचा तिसरा उमेदवार कोल्हापूरचाच दिला आहे. भाजपाला कदाचित काही इतर गोष्टींवर विश्वास असेल, म्हणून निवडणूक बिनविरोध झाली नाही”, असं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवारांची खंत

“महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे मिळून वाटचाल करत आहोत. फक्त खंत एका गोष्टीची आहे की महाराष्ट्राची एक परंपरा होती, एक संस्कृती होती. अशा प्रकारची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी परंपरा असताना भाजपाने त्याला फाटा दिला आहे. वेगळ्या पद्धतीने ताकद दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. असं आपण करत असू, तर ही गोष्ट महाराष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी घातक आहे. त्यांना काही गोष्टींचा गर्व असू शकतो. काही गोष्टी दिल्लीवरूनही आल्या असतील”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

एमआयएमनं पाठिंबा का दिला?

“भाजपा बऱ्याच गोष्टींचा दावा करते. राजकीय दृष्टीने ज्या गोष्टी त्यांना फायद्याच्या आहेत, त्याचाच दावा ते करतात. जिथे राजकारण येतं, तिथे ते अॅक्टिव्ह होतात. भाजपाने राजकीय हितासाठी त्यांची खेळी खेळलेली आहे. ज्या पक्षांना वाटतं की संविधान टिकलं पाहिजे, ते पक्ष एकत्र येऊ शकतात. त्याच कारणाने हे पक्ष एकत्र आले आहेत. त्याच आधारावर एमआयएमनं महाविकास आघाडीच्या उमेदावारांना पाठिंबा दिला आहे. संविधान टिकलं पाहिजे, या हेतूने कुणी पाठिंबा देत असेल तर त्याचं स्वागत करायला हवं”, असंही रोहित पवारांनी यावेळी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या