मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती द्यावी, शेतकऱ्याची राज्यपालांकडे मागणी

राज्यातील सत्ता नाट्य संपेपर्यंत मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती द्यावी शेतकऱ्याची राज्यपालांकडे मागणी 

 (प्रातिनिधीक फोटो)


एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात पुकारलेलं बंड आणि त्यांना समर्थन देणाऱ्या शिवसेना आमदारांबरोबरच शिवसेनेच्या सहय्योगी अपक्ष आमदारांची संख्या वाढत असतानाच राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी पडू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असं असतानाच राज्यातील सत्ता नाट्य संपेपर्यंत प्रभारी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला नियुक्ती द्यावी अशी मागणी एका शेतकऱ्याने महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे केलीय. यासंदर्भातील पत्रच या शेतकऱ्याने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाठवलं आहे. इतकच नाही तर या पत्राच्या तळाशी या शेतकऱ्याने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदी नियुक्ती देण्यासंदर्भात विनंती करणारं हे पत्र तात्काळ राज्यापालांकडे पाठवावं, अशी विनंतीही केलीय.

श्रीकांत विष्णू गदळे या शेतकऱ्याने २२ जून रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याची मागणी करणारं पत्र सादर केलं आहे. तरी यासंदर्भातील माहिती गुरुवारी समोर आलीय. ‘चालू विधानसभेचा कार्यकाळ संपला असून, राज्यात घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रभारी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करावी’ असा पत्राचा विषय आहे.

पत्रात लिहिलेले आहे की,

मी शेतकरी पुत्र श्रीकांत विष्णू गदळे राहता दहिफळ (वडमाऊली) तालुका केज, जिल्हा बीडचा रहिवाशी आहे. मी १० ते १२ वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात अग्रेसर आहे. शेतकरी गोरगरिबांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आहे. सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. अशावेळी सरकारने तात्काळ मदत करणे अपेक्षित होती. मात्र ती मिळाली नाही.

तरी आज मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्ष सत्तेत राहून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलेले आहे. राज्यावर नैसर्गिक आपत्ती कोसळली असताना सत्तेत राहून कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना दिलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू अथवा प्रभावी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती न देता मला प्रभारी मुख्यमंत्री म्हणून संधी द्यावी.



मी जनतेचे सर्व प्रश्न मार्गी लावेन. बेरोजगारी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊतोड कामगार या सर्वांना न्याय देण्याचं काम मी करेन. विवाध प्रश्न सोडवण्यासाठी आपण तात्काळ माझी नियुक्ती करावी ही विनंती.

राज्याचे राज्यपाल माझ्या पत्राची दखल घेऊन मला प्रभारी मुख्यमंत्री म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी देतील, असा विश्वासही गदळे यांनी व्यक्त केलाय.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या