मुद्रण इंडस्ट्रीत असंख्य नोकरीच्या संधी

 देश व  विदेशामध्ये उपलब्ध 



मुद्रण ही एक जगभरामध्ये सध्या जोरात विकसित होणारी इंडस्ट्री आहे. यामध्ये असंख्य नोकरीच्या संधी देश आणि विदेशामध्ये उपलब्ध आहेत.

गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे इतरांप्रमाणेच विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान झाले.

परीक्षा होऊन नुकतेच दहावी व बारावीचे निकाल लागलेले आहेत. सर्व पालक व विद्यार्थ्यांमध्ये आपल्या पुढील शिक्षणाची आणि करिअरच्या दृष्टीने क्षेत्र निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्वच पालकांची इच्छा असते की, माझ्या पाल्याने चांगल्यात चांगले शिक्षण घेऊन उच्च पदाची नोकरी अथवा मोठा व्यवसाय सुरू करावा. परंतु कोरोना महामारीमुळे काही पालकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे पगार कमी झाले अथवा इतरही काही आर्थिक अडचणींना सामोरे जात असताना सध्याच्या महागाईच्या काळात विद्यार्थ्याची शैक्षणिक फी आणि इतर खर्च परवडेल असाच कोर्स अथवा अभ्यासक्रम काहीजण निवडताना दिसतात.

मुद्रण ही एक जगभरामध्ये सध्या जोरात विकसित होणारी इंडस्ट्री आहे. यामध्ये असंख्य नोकरीच्या संधी देश आणि विदेशामध्ये उपलब्ध आहेत. दैनंदिन जीवनामध्ये सर्वच ठिकाणी प्रिंटींगचा वापर आपल्याला दिसून येतो. जगभरामध्ये आणि आपल्या शेजारी काय चालले आहे, हे जरी माहीत करून घ्यायचे असल्यास प्रत्येकाला वर्तमानपत्राचाच आधार घ्यावा लागतो. सध्याच्या इलेक्ट्रॉनिक युगात मोबाईलचा वापरही वाढलेला असला, तरी मोबाईलवर देखील प्रिंटिंग हे आलेच की, अगदी दुकानातून आणलेले वाण सामानापासून विमानातील प्रवाशांना व वैमानिकांनाही आवश्यक असणाऱ्या सूचना यापर्यंत सर्वच ठिकाणी प्रिंटिंगचा वापर हा करावाच लागतो. काही ठिकाणी अक्षरमुद्रा नसेल त्याठिकाणी सिंबॉलिक पद्धतीनेही असेल परंतु तेथेही प्रिंटिंग करावेच लागते. मग ते कागदावर असेल, प्लॅस्टिकवर असेल अथवा मोठ्या खोक्यांपासून मिठाईच्या बॉक्सवरचेही असेल. विविध वस्तूंचे पॅकिंग करण्यासाठी पॅकेजिंग क्षेत्रातसुद्धा प्लॅस्टिकवर मात करत पर्यावरण पूरक वस्तू तयार करणे, कागद, पुठ्ठा तयार करणे आणि त्यावरही प्रिंटिंग करणे हाही भाग अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असल्याने पेपर इंडस्ट्रीमध्ये आणि पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्येही मोठ्या संधी उपलब्ध आहेत त्यामुळे प्रिंटिंग बरोबरच याही क्षेत्रात करिअर घडविता येते.


अनेक संधी उपलब्ध

पारंपरिक पद्धतीने स्क्रीन प्रिंटिंगपासून अद्ययावत अशा तंत्रज्ञानामुळे डिजिटल प्रिंटिंग आणि थ्री डी प्रिंटिंगलाही जगभरातून मोठी मागणी असून, हे तंत्रज्ञान हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. जागतिक स्तरावर पुढील पाच वर्षांमध्ये या क्षेत्राची उलाढाल मोठ्या प्रमाणात होणार असून २.२७ टक्के इतक्या जास्त प्रमाणात व्यवसाय वाढण्याचे संकेत आजपर्यंतच्या आकडेवारीवरून दिसून येत आहेत. या संधीचा फायदा आपल्याला नक्कीच घेता येऊ शकतो आणि आपण प्री-प्रेस, प्रेस आणि पोस्ट प्रेस यामधील आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवू शकतो. जाहिरात क्षेत्रामध्येही होर्डिंगपासून मीडियामध्येही याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने हात काळे करावे लागणे, हाही गैरसमज निघून गेला आहे.


मुद्रण म्हणजेच प्रिंटिंग हा एक करिअरच्या दृष्टीने फारसा माहीत नसलेला अभ्यासक्रम आपण विचारात घेतल्यास या क्षेत्रामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी शासनाचा तीन वर्षांचा फूल टाइम कोर्स उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये कमी गुण पडले असतील अथवा दहावी नापास विद्यार्थ्यांना शासनमान्य एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्सही उपलब्ध आहे. एक वर्षाच्या सर्टिफिकेट कोर्स केल्याने अद्ययावत अशा मुद्रणातील तांत्रिक शिक्षणामुळे नोकरी अथवा छोटा व्यवसायदेखील सुरू करता येऊ शकतो व स्वतःचे पायावर उभे राहता येऊ शकेल.


दहावीनंतर पदविकेला शासनाच्या (डीटीई) नियमानुसार शासनाच्या वतीने महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि बीड येथे असलेल्या पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यासाठी आकारण्यात येणारी फी सुद्धा सर्वसामान्यांना परवडणारी असते. बारावीनंतर मुद्रण पदवीसाठी ते विद्यार्थी पात्र ठरू शकतात. त्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयांसंबंधी प्रवेशाचे नियम लागू होतात. ते सर्व नियम आणि प्रवेशाचे सर्व वेळापत्रक शासनाच्या वेबसाइटवर पहायला मिळतील सर्व प्रवेशासंबंधीचे नोटिफिकेशन स्थानिक वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केले जाते. बीई प्रिंटिंगच्या चार वर्षांच्या कोर्सनंतरही विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या दृष्टीने एमई अभ्यासक्रमासही प्रवेश घेता येतो अथवा परदेशामध्येही उच्च शिक्षणासाठी जाता येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या