वर्क फ्रॉम होम'मध्ये अडकलेली आयटीतील तरुणाई आता वळली या क्षेत्रात

 वर्क फ्रॉम होम'मध्ये अडकलेली आयटीतील तरुणाई आता कला शिक्षणाकडे वळली



वर्क फ्रॉम होम'मध्ये अडकलेली आयटीतील तरुणाई आता कला शिक्षणाकडे वळली आहे. नोकरीच्या पलीकडे आपण एखादी कला शिकावी अन् आपल्यातील कलाकारीला वाव मिळावा, यासाठी तरुण-तरुणी कला शिक्षणावर भर देत आहेत.

वीकेंडला सुटीच्या दिवशी विविध भाषा, गायन, नृत्य, वादन, चित्रकला, अभिनय अशा विविध कलांचे शिक्षण घेण्यास तरुणाई प्राधान्य देत आहे. कोणी ऑनलाइन वर्गाद्वारे तर कोणी प्रत्यक्ष वेळ काढून कलावर्गांना जात असून, अनेकांनी गायन, वादनाचे प्रशिक्षण घेऊन कार्यक्रमांत सादरीकरणही सुरू केले आहे.


आयटीतील नोकदार तरुण-तरुणीही आपल्या व्यग्र दिनक्रमातून कला शिक्षणाकडे वळले असून, गायन-वादनासह नृत्य, चित्रकला, नाट्याभिनय, सुलेखन, लेखन, पाककला आणि भाषा शिक्षणाकडे त्यांचा ओढा वाढला आहे. प्राधान्याने शनिवारी आणि रविवारी ते कला वर्गांमध्ये सहभाग घेत आहेत. वीकेंडला दोन तास कला वर्ग होत असून, प्रशिक्षक आयटीतील तरुणांसाठी आवर्जून वीकेंडला असे वर्ग घेत आहेत. त्याशिवाय काही जण लेखनाकडेही वळले आहेत. काही जण मराठी, हिंदी भाषेच्या लेखनासह मोडी लिपी शिकण्यासाठीही वेळ काढत आहेत. सहा महिने ते एक वर्षाच्या या ऑनलाइन-ऑफलाइन वर्गांसाठी एकूण साधारणपणे 15 ते 20 हजार रुपये शुल्क आकारले जात आहे.


आयटीत काम करणारा राज लोखंडे म्हणाला, 'मला विविध पाककृती तयार करण्याची आवड आहे. त्यामुळे मी सध्या पालकलेच्या ऑनलाइन वर्गात सहभागी होत आहे. मी वेगवेगळे खाद्यपदार्थ कसे तयार करायचे, याचे प्रशिक्षण घेत आहे. वीकेंडला दोन तास हे वर्ग असतात. या वर्गामुळे विविध खाद्यपदार्थ तयार करायचे शिकलो असून, आपल्याला एखादी कला शिकता येत असल्याचा आनंद मिळतो. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यू-ट्यूब चॅनेलवरील फूड व्हिडीओमधूनही मी वेगवेगळे पदार्थ तयार करायला शिकत आहे.'


आयटीतील तरुण बनले ब्लॉगर्स
सध्या आयटीतील तरुणाई वेळ काढून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यू-ट्यूबवरील व्हिडिओ पाहून कला शिक्षण घेत आहेत. वर्क फ-ॉम होममुळे घरी असलेली 22 ते 35 वयोगटातील तरुणाई तर चक्क फूड, ट्रॅव्हल आणि फिटनेस ब्लॉगिंगकडे वळली आहे. यू-ट्यूबवर अनेकांनी चॅनेल सुरू केले असून, त्या माध्यमातून ते वेगवेगळे व्हिडीओ अपलोड करीत आहेत. या फूड, ट्रॅव्हल आणि फिटनेस व्हिडीओला चांगला प्रतिसाद आहे. त्यातून त्यांची आर्थिक कमाईही होत आहे.


आयटीतील बरेच तरुण माझ्याकडून तबल्याचे प्रशिक्षण घेत आहेत. पुण्यातील चार ते पाच जण; तर अमेरिका, अबूधाबी, लंडन येथून काही जण तबला शिकत आहेत. ते यासंदर्भातील परीक्षाही देत आहेत. आयटी पार्कजवळ अनेक कलांशी संबंधित अनेक वर्ग सुरू आहेत. त्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. तबल्यासह की-बोर्ड, गिटार शिकण्यासही ते प्राधान्य देत आहेत.

– अविनाश पाटील, तबलावादक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या