अकरावी प्रवेशाचे नियोजन फसले

 


राज्यात अकरावी प्रवेशाचा भाग एक भरण्यास 30 मेपासून सुरुवात करण्यात आली.त्याला आता महिना होईल, तरीदेखील अकरावी प्रवेशाचा भाग दोन भरण्यास सुरुवात झालेली नाही. त्यातच यंदा भाग एकसाठी अपेक्षित अर्जदेखील आलेले नाहीत. त्यामुळे अकरावी प्रवेशाचे नियोजन फसले असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यातील पुणे- पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक या महापालिका क्षेत्रांत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ऑफलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया 30 मेपासून सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया दहावीच्या निकालानंतर सुरू होणार होती. मात्र, प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयांची नोंदणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी भाग दोनचे वेळापत्रक जाहीर करण्यास अडचण येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे पिंपरी-चिंचवड परिसरात प्रवेशासाठी आत्तापर्यंत 78 हजार 216 अर्ज भरण्यात आले आहे. त्यापैकी 52 हजार 554 अर्ज लॉक करण्यात आले आहेत. तसेच 29 हजार 345 अर्ज अ‍ॅटो व्हेरीफाईड करण्यात आले आहेत, तर 17 हजार 663 अर्जांची पडताळणी केंद्रावर तपासणी पूर्ण झाली आहे.


प्रवेशाला अडचण…


दरवर्षी सीबीएसई, आयसीएसई मंडळाचे दहावीचे निकाल अगोदर जाहीर होतात. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर होतो. यंदा मात्र राज्य मंडळाचा निकाल अगोदर जाहीर झाला आहे. याचा थेट परिणाम अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यावर झाला आहे.

वेळापत्रक नेमके कधी…


अकरावी प्रवेशाचा भाग दोन भरण्याबरोबरच प्रवेशाच्या पहिल्या यादीचे वेळापत्रक 22 जूनला जाहीर केले जाईल, असे उपसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. त्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक होणार असल्याचेदेखील स्पष्ट करण्यात आले होते, परंतु राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकारचा राजकीय पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे शालेय शिक्षण मंत्र्यांकडून लक्ष दिले जात नसल्यामुळे अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक लांबणीवर पडले असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले आहे.

कागदपत्रांची पूर्तता नाही…


पुणे आणि पिंपरी चिंचवड क्षेत्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया 2022-23 साठी नोंदणी करणे, माहिती अद्ययावत करणे, प्रमाणीकरण करून घेणे अनिवार्य आहे. मात्र शहरातील अनेक महाविद्यालयांनी अर्ज अंतिम केलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रमाणीकरण होऊ शकलेले नाही. तसेच 18 महाविद्यालयांनी सर्व आदेश अपलोड केलेले नाहीत, त्यांना पाठवण्यात आलेल्या त्रुटींच्या संदेशानुसार त्रुटी पूर्तता केलेली नाही. प्रमाणीकरण झाल्याशिवाय कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव संकेतस्थळावर दिसणार नाही, तसेच त्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या