‘मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती, पण….’,संजय राऊत यांचा खळबळजनक दावा


मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना सेनेपदावरून हटवले आहे. उद्धव ठाकरे यांनी परिपत्रक जारी करत हा आदेश दिला आहे. ईडी नावाची तलवार शिवसेनेच्या आमदारांवर मानेवर ठेवल्यामुळेच त्यांनी बंड केला असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. ‘मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती. मात्र, मी बाळासाहेबांना मानतो म्हणून गेलो नाही’. असा टोला राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपा सरकारला लगावला आहे. 

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. शिंदे गटाकडून फसवणूक केली जात आहे. त्यांच्या मनात आपण आपल्या नेत्याला फसवल्याची खदखद असल्याचे राऊत म्हणाले. तसेच लोकांना फसवणे हा भाजपाची पद्धत आहे. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलेले लोकही भाजपासारखेच वागत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. भाजपाला शिवसेनेची मुंबईतील ताकद कमी करायची आहे त्यामुळे ते शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवतं असल्याचेही राऊत म्हणाले.

ईडीकडून संजय राऊतांची १० तास चौकशी

शिवसेना खासदार संजय राऊत यांची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शुक्रवारी सुमारे १० तास चौकशी केली. यावेळी त्यांचा जबाबही नोंदवण्यात आला. गोरेगाव येथील पत्राचाळीच्या १ हजार ३९ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. यापूर्वी राऊत यांनी समाज माध्यमांवर ईडी कार्यालयाबाहेर कोणीही जमा होऊ नये, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. राऊत यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ईडी कार्यालयाबाहेर बंदोबस्त ठेवला होता. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारात ईडी कार्यालयात गेलेले संजय राऊत रात्री १० च्या सुमारास कार्यालयातून बाहेर पडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या