अनधिकृत शाळा यापुढे सुरू राहिल्या, तर......

 अनधिकृत शाळा यापुढे सुरू राहिल्या, तर शिक्षणाधिकारी किंवा प्रशासकीय अधिकार्‍यांच्या पगारातून दंड वसूली




पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये 51 शाळा अनधिकृत असून, त्या बंद करण्या करण्यात आल्या आहेत. जर अशा शाळा यापुढे सुरू राहिल्या, तर तेथील शिक्षणाधिकारी किंवा प्रशासकीय अधिकार्‍यांच्या पगारातून शाळांच्या दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल,' असा इशारा पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिला आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीला शिक्षण विभागाने पुणे शहर व ग्रामीण भागातील 41 तसेच पिंपरी-चिंचवडमधीलही 10 शाळांची यादी जाहीर केली होती. सोलापूर व अहमनगरमध्ये मात्र एकही अनधिकृत शाळा आढळून आली नाही. या शाळांची नावे जाहीर केल्याने ज्या पालकांनी त्यामध्ये त्यांच्या पाल्यांना प्रवेश दिला होता, त्यांचे दाखले काढून घेतले व त्यांचा प्रवेश इतर शाळांमध्ये केला. अनधिकृत शाळांपैकी एक वगळता सर्व शाळा या वर्षी सुरू झाल्या होत्या.


या अनधिकृत शाळा बंद करण्याच्या कारवाईचे आदेश दिलेले असतानाही त्या सुरू असल्याची माहिती उपसंचालक कार्यालयाला मिळाली आहे. त्यामुळे उपसंचालक उकिरडे यांनी तीनही जिल्ह्यांच्या शिक्षण विभाग प्रशासनास परिपत्रक जाहीर करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत. त्याचा अहवाल तत्काळ सादर करण्यास सांगितले आहे.


पुण्यातील सर्व अनधिकृत शाळा बंद करण्यात आल्या आहेत. जर त्या शाळा सुरू असतील, तर त्या शाळेशी संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांवरच कारवाई करून त्यांच्या पगारातून ही रक्कम वसूल करण्यात येईल, असे संबंधित अधिकार्‍यांना कळविले आहे.
– औदुंबर उकिरडे, शिक्षण उपसंचालक


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या