भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी; उंच उडी, ज्युडो, वेटलिफ्टिंग आणि स्क्वॉशमध्ये केली पदकांची कमाई


राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंची विजयी घौडदौड सुरुच आहे. भारतीय खेळाडूंनी एकाच दिवसात चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये चार पदकांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पहिल्यांदाच भारताला उंच उडी प्रकारामध्ये तेजस्वीन शंकरने कांस्य पदक पटकावत पदकाची कमाई करुन दिलीय. याचप्रमाणे वेटलिफ्टिंगमध्येही भारताच्या गुरदीप सिंगने कांस्य पदक पटाकवलं आहे तर महिलांच्या ७८ किलो वजनी गटात महिला ज्युडोपटू तुलिका मानने रौप्य पदकावर नाव कोरलं. याचप्रमाणे स्क्वॉशमध्ये सौरभ घोषालने भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केली.

तेजस्वीन शंकरने २.२२ मीटरची उंच उडी घेत कांस्य पदकाला गवसणी घातली. २३ वर्षीय तेजस्वीनने अॅथलेटिक्स प्रकारातील उंच उडीमध्ये ही कौतुकास्पद कामगिरी करत पहिल्यांदाच या प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताच्या नावावर पदकाची नोंद केलीय. “मी फार आनंदी आहे की मला पदक जिंकता आलं आणि मी अॅथलेटिक्समध्ये भारताचं खातं उघडलं. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि मला संधी देणाऱ्या प्रत्येकाचा मी आभारी आहे. मला वाटतं राष्ट्रकुल स्पर्धांमधील उंच उडीमधील हे भारताचं पाहिलं पदक आहे,” असं मत तेजस्वीनने विजयानंतर व्यक्त केलं.

दुसरीकडे सुवर्णपदकाच्या सामन्यात पराभूत झाल्याने तुलिका मान ज्युडोमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत स्कॉटलंडची गतविजेती अॅडलिंग्टनकडून तुलिका पराभूत झाली. २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोमध्ये भारताचे हे तिसरे पदक ठरले आहे. अंतिम सामन्यात तुलिकाने चांगली सुरुवात केली होती. मात्र, तिला कामगिरीमध्ये सातत्य राखता आले नाही. परिणामी, तिचा पराभव झाला. 

वेटलिफ्टिंगमध्ये गुरदीप सिंगने कांस्य पदक पटकावलं. १०९ किलोहून अधिक वजनी गटामध्ये गुरदीपने एकूण ३९० किलो वजन उचलत पदकावर नाव कोरलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या