धावता-धावताच होणार बस अन् ट्रकचं चार्जिंग; वाचा गडकरींचा प्लॅन.


भारतात लवकरच इलेक्ट्रिक हायवे सुरू केला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स या उद्योग संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

गडकरी म्हणाले की, केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी सौर आणि पवन ऊर्जेवर आधारित चार्जिंग प्रणाली विकसित करण्यास प्रोत्साहन देत आहे. सौरऊर्जेवर चालणाऱ्या विद्युत महामार्गांच्या विकासावरही सरकार काम करत आहे. याशिवाय, रस्ते मंत्रालय सर्व टोल प्लाझा सौर आणि पवन ऊर्जेवर चालवण्यास प्रोत्साहित करत आहे. इलेक्ट्रिक हायवे विकसित झाल्यास महामर्गांवरून अवजड वाहतूक करणारी वाहनं जसे की, ट्रक-बसचं धावता-धावताच चार्जिंग होण्यास मदत होणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी सौरऊर्जा आधारित चार्जिंग केंद्र विकसित करण्यात केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर ट्रक सारखी आणि बससारखी अवजड वाहनं न थांबताच चार्जिंग करणं सुलभ होईल असे गडकरी म्हणाले.

टोल प्लाझावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि वाहनधारकांना सोयीस्कर पद्धतीने शुल्क आकारण्यासाठी स्वयंचलित नंबर प्लेट ओळख प्रणालीवरही काम केले जात आहे. यासाठी सरकार पथदर्शी प्रकल्प राबवत असून, त्याद्वारे महामार्गावर जाणाऱ्या वाहनांकडून अचूक अंतराच्या आधारे टोल आकारला जाईल. या नवीन तंत्रज्ञानाद्वारे आम्हाला दोन उद्दिष्टे साध्य करायची आहेत. यामध्ये टोल बूथवरील मुक्त वाहतूक आणि वापरानुसार पैसे देणे या दोन गोष्टींचा समावेश आहे. 2018-19 मध्ये टोल प्लाझावर वाहनांची सरासरी प्रतीक्षा वेळ आठ मिनिटे होती, तर 2020-21 आणि 2021-22 मध्ये ही वेळ 47 सेकंदांवर आली असल्याचेही यावेळी गडकरींनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या