मोटारीवर गोळीबार करुन साडेतीन कोटी रुपयांची रोकड लुटणारे जेरबंद ; इंदापूर परिसरातील घटना


पुणे :
मोटारीवर गोळीबार करुन कुरिअर व्यावसायिकाकडील तीन कोटी ६० लाखांची रोकड लुटून पसार झालेल्या चोरट्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या गु्न्हे शाखेने पकडले. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी तसेच राजस्थानातून चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. चोरट्यांकडून एक कोटी ४३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

सागर शिवाजी होनमाने (वय ३४), बाळू उर्फ ज्योतीराम चंद्रकात कदम (वय ३२, दोघे. रा. कुर्डुवाडी, जि. सोलापूर), रजत अबू मुलाणी (वय २४, रा. न्हावी, इंदापूर), गौतम अजित भोसले (वय ३३, रा. माढा, जि. सोलापूर), किरण सुभाष घाडगे (वय २६), भूषण लक्ष्मीकांत तोंडे (वय २५, रा. दोघे. इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सागर होनमाने सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अमली पदार्थ विक्री प्रकरणी गुन्हे दाखल असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॅा. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

२६ ऑगस्ट रोजी पुणे-सोलापूर रस्त्यावरील इंदापूर परिसरात वरकुटे पाटी गावाजवळ ही घटना घडली होती. याबाबत भावेशकुमार अमृत पटेल (रा. गुजरात) यांनी फिर्याद दिली होती. पटेल कुरिअर व्यावसायिक आहेत. नांदेड, सोलापूर, लातूर परिसरातील व्यापाऱ्यांनी दिलेली रोकड घेऊन सोलापूर रस्त्याने ते मुंबईकडे निघाले होते. वरकुटे पाटी गावाजवळ मोटार अडवून गोळीबार करण्यात आला होता. पटेल आणि कर्मचाऱ्यांना धमकावून तीन कोटी ६० लाखांची रोकड लुटण्यात आली होती. पटेल यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली होती. सीसीटीव्ही चित्रीकरण तसेच तांत्रिक तपासात आरोपी कुर्डुवाडी भागातील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर होनमाने, कदम, मुलाणी यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत साथीदार राजस्थानध्ये पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात आणखी काहीजण सामील असल्याची शक्यता असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक डॅा. देशमुख यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अशोक शेळके, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे आणि पथकाने ही कामगिरी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या