“द्वेषाच्या राजकारणामुळे मी माझ्या वडिलांना गमावलं आहे, पण आता…”, ‘भारत जोडो’ यात्रेआधी राहुल गांधींचा निर्धार


काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या आधी राहुल गांधी यांनी भावनिक संदेश दिला असून, द्वेषाच्या राजकारणामुळे आपण आपल्या वडिलांना गमावलं आहे, पण आपला देश गमावण्यासाठी तयार नाही असं म्हटलं आहे. कन्याकुमारी येथून काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ भव्य यात्रेला सुरुवात होणार असून, राहुल गांधींनी त्याआधी तामिळनाडूमध्ये श्रीपेरुंबदुर येथील वडिलांच्या स्मृतीस्थळाला भेट देत अभिवादन केलं.

श्रीपेरुंबदुर येथेच २१ मे १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. “द्वेष आणि फाळणीच्या राजकारणामुळे मी माझ्या वडिलांना गमावलं आहे. पण यासाठी आपला देश गमावणार नाही. प्रेम द्वेषावर विजय मिळवेल. आशा भीतीवर मात करेल. एकत्र येऊन आपण सर्वजण यावर मात करु,” असं ट्वीट राहुल गांधी यांनी वडिलांच्या स्मृतीस्थळावरील फोटो शेअर करत केलं आहे.

स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर राहुल गांधी कन्याकुमारीसाठी रवाना झाले आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यात्रा सुरु कऱण्यासाठी त्यांच्याकडे तिरंगा सोपवणार आहेत. देशातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी यात्रा असेल असं काँग्रेसने सांगितलं आहे. संध्याकाळी ५ वाजता यात्रेचा शुभारंभ होणार असून, ही यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर असं ३५०० किमी अंतर पार करणार आहे. राहुल गांधींसोबत ११८ ‘भारत यात्री’ यामध्ये सहभागी होणार आहेत.

२०२४ लोकसभा निवडणुकीत पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु असून, ही यात्राही त्याचाच भाग आहे. पक्षातून अनेक महत्त्वाचे नेते बाहेर पडत असतानाच ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. नुकतंच, गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत.

काँग्रेसने देशाला एकत्र करणं हा यात्रेचा मुख्य उद्देश असून, बेरोजगारी, महागाई अशा मुद्द्यांवर लोकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या