महाराष्ट्र पोलीस विभागात वीस हजार पदांची मेगा भरती, उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा.



 मुंबई : राज्यात पोलीस विभागात २० हजार पदांची भरती करणार असल्याची मोठी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर तुरुंग विभागात अमुलाग्र बदल करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. 

फडणवीस म्हणाले, "मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन आम्ही पोलीस भरतीचा निर्णय घेतला असून दोन वर्षांची भरती प्रक्रिया लवकरच हातात घेत आहोत. पोलिसांची सुमारे २० हजार पदं भरण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. ८ हजार पोलिसांच्या भरतीची एक जाहीरात यापूर्वी निघाली आहे, पुढे आणखी १२ हजार पोलिसांच्या भरतीची जाहीरात प्रसिद्ध होईल. यामुळं पोलीस दलाला मोठा फायदा होईल"

रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे. तो वाढवण्याच्या दृष्टीनं काय उपायोजना करता येतील तसेच जेल विभागात सुधारणा करणं गरजेचं आहे. सध्या आपल्या जेलमध्ये १,६४१ कैदी असे आहेत ज्यांना जामीन मिळालेला आहे पण जामिनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आणि व्यक्ती नसल्यानं ते तुरुंगातच आहेत. अशा लोकांना जी काही कायदेशीर मदत करता येईल? त्यांना बाहेर कसं काढता येईल? त्यासाठी एनजीओंची मदत घेण्याचा विचार सुरु आहे, असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

तसेच सायबर सिक्युरिटीबाबत मी आढावा घेतला असून याबाबतचं सायबर सिक्युरिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचा मानसं आहे. फिशिंगमुळं लोकांना विविध फसवणुकींना सामोर जावं लागतं, त्यामुळं सायबर सिक्युरिटीसाठी मोठं कॅम्पेनही आम्ही हाती घेणार आहोत, असंही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या