राज ठाकरे आक्रमक ! मनसे नागपुरात भाजपा विरुद्ध लढणार .



 नागपूर : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये भेटीगाठी झाल्या होत्या. या सर्वामध्ये भाजप आणि मनसे युती होणार अशा चर्चांनादेखील उधाण आले होते. सध्या राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्याची सुरूवात भाजपचा बालेकिल्ला नागपूरमधून झाली आहे. यावेळी त्यांनी भाजप आणि मनसेच्या युतीबद्दल मोठं विधान केले आहे. मात्र, त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. यावेळी त्यांनी वेदांता-फॉक्सकॉन वादावरून हल्लाबोल केला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, हा विदर्भ सर्वात पहिले काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, आज जर हा भाजपाचा बालेकिल्ला झाला असेल तर, तो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केलेल्या संघर्षातून त्यांच्या हाती आला आहे. त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहूनच अनेक पक्ष मोठे होतात. प्रत्येक ठिकाणी अनेकांना प्रस्थापितांच्या विरोधातच उभं राहावं लागतं. त्यामुळे जर नागपूरात जर भाजप प्रस्थापित असतील तर, त्यांच्या विरोधातच लढावं लागेल असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसे स्वबळावर लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

यावेळी नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. तसेच घटस्थापनेनंतर लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यात मनसेला स्थापन होऊन 16 वर्षे झाली तरी, विदर्भात पक्षाचं अस्तित्व नाही. ज्या गतीने पक्ष विस्तार व्हायला हवा होता, तसा विस्तार झाला नाही. विदर्भात अनेक तरुण-तरुणी मनसेत काम करण्यास इच्छुक आहेत. त्यांना संधी देण्यात येईल, असेही राज ठाकरे म्हणाले.

यावेळी राज ठाकरे यांनी वेदांता-फॉक्सकॉनवादावरून मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. तसेच ही चर्चा नेमकी कुठं फिस्कटली हे सत्य बाहेर येण्यासाठी या सर्व प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. या प्रकरणात पैशांची मागणी केली गेली आहे का? याचीही चौकशी व्हावी असेही राज यांनी यावेळी स्पष्ट केले. मनसेने मविआ सरकारचं कधीच कौतुक केलं नाही. सत्ताधाऱ्यांविरोधात लढूनच पक्ष मोठा होत असतो, असंही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या