'राज्यात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करा' : पद्मश्री राहीबाई पोपरे यांची शासनाकडे मागणी.



 अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यामध्ये खरीप हंगामात पेरणी केलेल्या बहुसंख्य पिकांना अतिवृष्टीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील पिके हातातून जाताना दिसत आहेत. पाण्यात वाहून गेलेली पिके पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. मोठ्या कष्टाने उभी केलेली भात शेती, नागली, वरई तसेच इतर खरीपातील पिके अत्यंत नाजूक परिस्थितीत आहेत. संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याचं संकट शेतकऱ्यांवर उभे ठाकले आहे.

संपूर्ण भात शेती उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. आदिवासी पट्ट्यातील बहुसंख्य शेती ही पावसावर अवलंबून असते. सुरुवातीला पाऊस उशिरा आल्याने भात लागवड उशिरापर्यंत सुरू होत्या. त्यामुळे सुरुवातीलाच हवामान बदलाचा फटका बसलेली शेती कशीबशी कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी उभी केली होती. परंतु जुलै, ऑगस्ट आणि आता सप्टेंबर महिन्यांत सातत्याने जोरदार पाऊस सुरू असून शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून जातो की काय? याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

जोरदार पाऊस आणि त्यात विविध पिकांवर वाढलेला प्रादुर्भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. देश आणि विदेशात बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची शेतीही पावसामुळे उद्धवस्त झाली आहे. वर्षभर गावरान आणि अस्सल गावठी बियाण्यांची मागणी त्यांच्याकडे होत असते. परंतु चालू हंगामात कुठलेही बियाणं तयार होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर गावरान बियाणे निर्मितीचे प्रचंड मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

पावसामध्ये काबाडकष्ट करून उभे केलेले पिके डोळ्यासमोर अतिवृष्टीने झोडपून खराब झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान बघून त्यांना अश्रू अनावर झाले. सर्व शेतकऱ्यांची वैफल्यग्रस्त परिस्थिती असून शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी राहीबाई पोपेरे यांनी शासनाकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या