अखेर घराणेशाही संपुष्टात;खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष !



 काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले आहेत. या दोन्ही उमेदवारांचे आणि काँग्रेस पक्षाचे भवितव्य सोमवारी मतपेट्यांमध्ये बंद झाले होते. या निवडणुकीमुळे काँग्रेसला दोन दशकांहून अधिक काळानंतर प्रथमच गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. शशी थरूर यांना 1072 मत मिळाली आहेत. तर मल्लिकार्जुन खरगे यांना 7898 मत मिळाली असून ते विजयी ठरले आहेत.

काँग्रेसच्या 137 वर्षाच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे. या दोन्ही उमेदवारांचे आणि काँग्रेस पक्षाचे भवितव्य सोमवारी मतपेट्यांमध्ये बंद झाले होते. अध्यक्षपद निवडणुकीसाठी जवळपास 96 टक्के मतदान झालं होतं. 24 अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयात सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली होती.

काँग्रेस पक्षनेते 2019 पासून ज्याची वाट पाहात होते, ते अध्यक्ष आज पक्षाला मिळाले आहेत. राहुल गांधी यांनी 2019 मध्ये काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून काम बघत होत्या मात्र पक्षाची देशभरातील एकंदरीत स्थिती पाहता पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी अध्यक्ष असणं गरजेचे असल्याचे वेळोवेळी दिसून आलं आहे. अध्यक्षांची मागणी होताना अध्यक्ष गांधी घराण्यातीलच व्हावा अशी अनेकांची इच्छा होती, मात्र राहुल गांधींचा अध्यक्षपद स्वीकारण्यासाठीचा नकार, सोनिया गांधी यांची खालावलेली तब्येत आणि प्रियांका गांधी वड्रा यांच्या हाती फारसं यश न लागणं यासर्व गोष्टींमुळे 'नॉन-गांधी' हाच एक पर्याय पक्षाकडे राहिला होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या