वादळी पावसाचा फटका ४० गावांना, मदत मात्र १४ गावांना !

 



वैजापूर : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये खरीप पिके भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वास्तविकता पाहता तालुक्यातील ४० पेक्षा जास्त गावांना तडाखा बसलेला असताना प्रशासनाने तालुक्यातील केवळ १४ गावांतील तीन हजार ४८० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना ३३ टक्क्यांपेक्षा जास्त तडाखा बसल्याचा जावईशोध लावला आहे. विशेष म्हणजे गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच भरपाई मिळणार आहे.

३ सप्टेंबर रोजी तालुक्यात वादळी पावसासह गारपिटीमुळे खरीप पिकांची हानी झाली. बहुतांश ठिकाणी पावासापेक्षा वादळाच्या चपाट्यात सापडून पीक भुईसपाट झाली. वादळामुळे जवळपास ४३ गावांतील पिकांना कमी-अधिक प्रमाणात तडाखा बसल्याच समोर आले आहे. आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसीलदार राहुल गायकवाड यांच्यासह प्रभारी गटविकास अधिकारी हणमंत बोयनर, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी १४ गावांनाच गारपीट व वादळी पावसाचा तडाखा बसल्याचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे.

या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने बैठक बोलावली होती. बैठकीत प्रत्यक्षस्थळी जाऊन नुकसानीबाबत वस्तुनिष्ठ माहिती संकलित करा, असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातील १४ गावांतील पाच हजार २२२ शेतकऱ्यांच्या तीन हजार ४८० हेक्टर जिरायती क्षेत्रावरील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान तर एवढ्याच गावांतील सात हजार ६६२ शेतकऱ्यांच्या पाच हजार ३१६ हेक्टर जिरायती क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान माहिती सादर करण्यात आली. दरम्यान ३ सप्टेंबर रोजी रात्री पाऊस झाला. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी तलाठ्यांची बैठक बोलावून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. ६ सप्टेंबर रोजी लगेच प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला.

नुकसानग्रस्त गावांच्या प्राथमिक यादीला नेमक्या कुठल्या आधारावर अंतिम स्वरूप देण्यात आले, १४ गावे वगळता अन्य गावांत पिकांचे नुकसान झालेच नाही का? नुकसान झाले असेल तर ते शेतकरी नुकसान भरपाईस पात्र नाहीत का? नुकसान असतानाही त्यांना मदत नाही मिळाली तर त्यांनी दाद कुणाकडे मागायची? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे प्रशासनाने ज्या ठिकाणी गारपिटीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले, अशाच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे या टक्केवारीच्या आत ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या तोंडाला मात्र पाने पुसली जाणार असल्याचे स्पष्ट झाल्याने बळिराजाने रोष व्यक्त केला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या