आ. लंकेंच्या पुढाकारातून बेलवंडी फाट्यावर तरकारीचे घाऊक मार्केट शुक्रवारी उदघाटन

 


पारनेर :  शिरूर बाजार समितीमधील तरकारी खरेदी विक्री पहाटे चार वाजता करण्याच्या प्रशासनाच्या आडमुठया धोरणामुळे वेठीस धरल्या गेलेल्या पारनेर व श्रीगोंदे तालुक्यातील तरकारी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीला आमदार नीलेश लंके हे धावून आले असून या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता बेलवंडी फाटा येथे स्वतंत्र तरकारी मार्केट सुरू करण्यात येणार आहे. नीलेश लंके प्रतिष्ठाणचे प्रदेशाध्यक्ष सुदाम पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेलवंडी फाटा येथे दोन एकरामध्ये या मार्केटची उभारणी सुरू केली असून शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब ठरणार आहे. 

     शिरूर बाजार समितीमध्ये दररोज सायंकाळी तरकारी मालाची खरेदी विक्री करण्यात येते. गेल्या पंधरा दिवसांपासून बाजार समिती प्रशासनाने ही खरेदी विक्री सायंकाळी न करता पहाटे चार वाजल्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विशेषतः पारनेर व श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली होती. कडाक्याच्या थंडीत पहाटे चार वाजता तरकारी घेऊन शिरूर येथे पोहचणार कसे असा प्रश्‍न निर्माण झाला होता. रात्रीच तरकारी घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांनी आवारात येऊ नये यासाठी बाजार समितीकडून मुख्य प्रवेशद्वारही बंद करण्यात येत होते. त्यामुळे शेतकरी वर्गाला थंडीमध्ये रात्र डोक्यावर घेऊन पहाटे चार वाजण्याची वाट पहावी लागत होती. 

     शेतकऱ्यांच्या या व्यथा आमदार नीलेश लंके यांच्यापर्यंत पोहचविण्यात आल्यानंतर त्यांनी मंगळवारी मध्यरात्री तरकारी माल घेऊन शिरूरमध्ये थांबलेल्या पारनेर व श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. बाजार समिती प्रशासनाची संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. पारनेर व श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय दिलाच पाहिजे अशी भूमिका आ. नीलेश लंके यांनी घेत यावर काय तोगडा काढला पाहिजे अशी विचारणा केली गेली असता दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सोयीचे ठरेल असे बेलवंडी फाटा येथे तरकारी मार्केट सुरू करण्याची आग्रही मागणी लंके यांच्याकडे करण्यात आली. मार्केेट सुरू झाल्यांनतर व्यापाऱ्यांशीही आ. लंके यांनी संवाद साधला. व्यापाऱ्यांनी तयारी दर्शविल्यानंतर येत्या दोन तीन दिवसांत बेलवंडी फाटा येथे मार्केट सुरू करण्याची घोषणा आ. लंके यांनी केली. तेथूनच एका व्यक्तीस फोन करीत जागा उपलब्ध करून देण्याची गळ आ. लंके यांनी घातली. आमदार लंके यांचा शब्द मी कसा टाळणार असे सांगत त्या व्यक्तीने दोन एकर जागा उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी टाळया वाजवून आ. लंके यांच्या तत्परतेचे स्वागत केले.  

     यावेळी सुदाम पवार, कांतीलाल भोसले, किशोर यादव, दिपक खंदारे, बाबूशेठ राक्षे, जालिंदर तानवडे, मावळेवाडीचे सरपंच उदय कुरकुटे, कुरूंद येथील राजू कर्डीले, नीलेश शेंडगे, दादा वाळुंज, संतोष कुरकुटे, रामदास शहाजी भोसले, संतोष चौधरी, दत्ता कारखिले, संपतराव चौधरी, रंगनाथ तानवडे, नवनाथ तानवडे, दत्ता पठारे, माजी सरपंच नानाभाऊ कुरकुटे, बाळा ब्राम्हणे यांच्यासह असंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते. 

▪️चौकट 

आ. लंकेंचा शब्द आणि बाबूशेठची मान्यता 


बेलवंडी फाटा येथे जागा उपलब्ध करण्यासाठी आ. लंके यांनी तेथील व्यवसायिक बाबूशेठ राक्षे यांना फोन करून दोन एकर जागेसाठी शब्द टाकला. आ. लंके यांचा फोन गेल्यानंतर त्यांच्या शब्दाला मान देत राक्षे यांनी दोन एकर जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली. 


▪️फोटो ओळ


तरकारी घेऊन गेलेल्या कडाक्याच्या थंडीत कुडकुडत असलेल्या शेतकऱ्यांची आमदार नीलेश लंके यांनी मध्यरात्री भेट घेऊन बेलवंडी फाटा येथे तरकरी मार्केट सुरू करण्याची घोषणा केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या