वाघीरे संकुलात प्राथमिक शाळांच्या क्रीडा करंडक स्पर्धेचे उद्घाटन



सासवडच्या म. ए.सो. वाघीरे संकुलात प्राथमिक शाळांच्या क्रीडा करंडक स्पर्धेचे उद्घाटन



महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्यपूर्व काळात इ.स.१८६० मध्ये स्थापन झालेली महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था. 

ही संस्था आपल्या अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे महाराष्ट्रात विख्यात आहे.विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशीलता विकसित  होणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्यांच्यात क्रीडाकौशल्याचा विकास होणेही महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना क्रीडाविषयक मार्गदर्शन मिळावे म्हणून म. ए. सो. ने  'क्रीडा वर्धिनी'ची स्थापना केली आहे. 


संस्थेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने क्रीडा वर्धिनीने २०१० मध्ये प्राथमिक इयत्तांमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी क्रीडा करंडक सुरू केला. लहान वयातच क्रीडाकौशल्याचे बीज मुलांमध्ये रुजविणे हा त्यामागील हेतू आहे. 


दि.२०,२१ आणि २२ जानेवारी या दिवशी सासवड येथील म.ए.सो.वाघीरे संकुलात ११ व्या 'प्राथमिक शाळा क्रीडा करंडक' स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. म.ए.सो.च्या एकूण १४ प्राथमिक शाळा आणि सासवडमधील ५ स्थानिक प्राथमिक शाळांचे एकूण सुमारे १००० विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत. गोल खो-खो, लंगडी, डॉजबॉल अशा अनेक क्रीडाप्रकारांमध्ये या स्पर्धा होत आहेत.


या स्पर्धांच्या उद्घाटनाचा समारंभ आज दि.२० जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजता वाघीरे संकुलाच्या क्रीडांगणावर पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर चीफ मार्शल (निवृत्त) श्री. भूषणजी गोखले हे होते. म.ए.सो.च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री.राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष श्री.बाबासाहेब शिंदे आणि उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, सचिव श्री.भरत व्हनकटे, सहसचिव श्री.सुधीर गाडे, क्रीडा वर्धिनीचे अध्यक्ष श्री.विजय भालेराव, वाघीरे संकुलाचे महामात्र श्री. सुधीर भोसले, क्रीडावर्धिनीचे समन्वयक श्री. शैलेश आपटे, संस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री.सचिन अंबर्डेकर हे सर्व मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. 


कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी सरस्वतीपूजन केले. विद्यालयाची राष्ट्रीय खेळाडू कु.तन्मयी कोकरे क्रीडाज्योत सभा स्थानी आणली. त्यानंतर श्री.भूषणजी गोखले यांनी क्रीडाध्वज फडकविला. क्रीडा स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी तन्मयी कोकरे हिने सर्व विद्यार्थ्यांना 'क्रीडा शपथ' दिली. त्यानंतर म.ए.सो.बालविकास मंदिरच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन, शिक्षक श्री.नरेंद्र महाजन यांच्यासोबत क्रीडा गीत त्यानंतर म.ए.सो.गीत आणि रिबन नृत्य इत्यादी कार्यक्रम सादर केले. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक म. ए.सो.च्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्री.बाबासाहेब शिंदे यांनी केले. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागांसाठी शासन क्रीडा स्पर्धा घेत असते पण प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा करंडक स्पर्धा घेणारी म.ए.सो. ही महाराष्ट्रातील पहिली संस्था असल्याचे त्यांनी नमूद केले. यानंतर वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ यांनी मान्यवरांचा परिचय सर्वांना करून दिला व त्यांचे स्वागत केले.


आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री.भूषणजी गोखले यांनी आपण म.ए.सो.चे माजी विद्यार्थी असल्याचा अभिमानाने उल्लेख केला. नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत क्रीडा शिक्षणामध्ये अशा प्राथमिक शाळांच्या क्रीडा स्पर्धांचा समावेश व्हावा म्हणजे त्यातून मुलांचा शारीरिक विकास साधेल आणि बुद्धीची तल्लखताही वाढेल असे मत त्यांनी मांडले. 


कार्यक्रमातील आभारप्रदर्शन म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे प्रमुख विजय भालेराव यांनी केले. यानंतर कार्यक्रमाची सांगता, संगीत शिक्षिका कु. ऐश्वर्या कामथे यांनी संपूर्ण वंदे मातरम् गाऊन केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका शकुंतला आहेरकर यांनी केले. कार्यक्रमानंतर लगेचच क्रीडास्पर्धांना सुरुवात झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या