देशात 100 कोटी लसीकरण पूर्ण


नवी दिल्ली 

कोरोना महामारीविरुद्धच्या युद्धात देश एक मोठी कामगिरी साध्य केली आहे. भारतातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने गुरुवारी, 100 कोटींचा टप्पा पार केला. आतापर्यंत जगात फक्त चीनने 100 कोटींहून अधिक लसीकरण केले आहे. 

भारतात आतापर्यंत, 18 वर्षांवरील 75 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 31 टक्क्यांहून अधिक लोकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. देशात 18 ते 44 वयोगटातील 55,29,44,021, तसेच 45 ते 59 वयोगटातील 26,87,65,110 आणि 60 वर्षांवरील 16,98,24,308 लोकांचे देशात लसीकरण करण्यात आले आहे.

दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीचा 100 कोटीवा डोस देण्यात आला. हा डोस अरुण रॉय यांना देण्यात आला.  अरुण रॉय हे दिव्यांग असून, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीचे रहिवासी आहेत. अरुण रॉय यांनी म्हटले की, जेव्हा ते दिल्लीला आले होते, तेव्हा देशात 70 कोटी लसमात्रा देण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ठरवले की आपण 100 कोटीवी लसमात्रा घ्यायची. रॉय दिल्लीमध्ये आपल्या एका मित्राकडे आले होते. त्या मित्राला त्यांनी लसीसाठी नोंदणी करायला सांगितले.

स्पाईसजेटने गुरुवारी दिल्ली विमानतळावर 100 कोटी डोसचे ध्येय साध्य करण्याबद्दल विशेष गणवेश जारी केला. देशातील सर्वात मोठा खादी तिरंगा गुरुवारी लाल किल्ल्यावर लसीकरणाअंतर्गत दिलेले 100 कोटी डोस पूर्ण झाल्यावर फडकवला गेला. या तिरंग्याची लांबी 225 फूट आणि रुंदी 150 फूट आहे आणि त्याचे वजन सुमारे 1,400 किलो आहे. गांधी जयंतीला 2 ऑक्टोबर रोजी लेहमध्ये हाच तिरंगा फडकवण्यात आला होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या