100 कोटी लसीकरण पूर्ण झाल्या निमित्त तिरंगी रोषणाई


पुणे  प्रतिनिधी

भारताने लसीकरणातील एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत सुमारे 100 कोटी लसीकरण पूर्ण केले आहे. यानिमित्ताने युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असलेल्या देशातील शंभर ऐतिहासिक स्थळांवर तिरंगी रोषणाई करण्यात आली. यामाध्यमातून गेली 18 महिने करोनाशी झुंजताना महत्त्वाची कामगिरी निभावणारे करोना वॉरिअयर्स, डॉक्‍टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आणि इतर सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्यात आली. देशासाठी हा एक गौरवाचा दिवस असल्याची भावना नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून व्यक्‍त केली जात आहे.पुण्यात तिरंगी रोषणाईने लखाखलेला शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेस पाहण्यासाठी नागरिकही कुतुहलाने या स्थळांच्या भोवती जमले होते. या स्थळांच्या बाहेर सेल्फी, फोटो काढत नागरिकांनी हा क्षण साजरा केला. भारताने गुरुवारी (दि.21) 100 कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला. हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी पुरातत्व शास्र विभागाने देशातील 100 ऐतिहासिक स्थळांवर तिरंगी रोषणाई केली होती. यात शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेस या ठिकाणीदेखील तिरंगी रोषणाई करण्यात आल्याने या दोन्ही वास्तूंना अनोखे रूप प्राप्त झाले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या