शिर्डी
नगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज 15 हजार लोकांचे कोवीड चाचण्या होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. आज ही जिल्ह्यात लसीचे 1 लाख 17 हजार डोस शिल्लक आहेत. तेव्हा जिल्ह्यात लसीकरण मोहीम व्यापकपणे राबविण्याची गरज आहे. यासाठी गावपातळीवरील ग्रामसेवक,तलाठी,आरोग्य कर्मचारी यांनी सातत्यपूर्ण काम करावे. अशा सूचना राज्याचे ग्रामविकास,कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केल्या.
अकोले विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामे, अकोले नगरपंचायत हद्दीतील 12 कोटी 12 लाख रूपयांचे कामांचे व अकोले बाजारतळ सुशोभीकरणाच्या 4 कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपूजन श्री. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज झाले. त्यानंतर अकोले येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित करोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार किरण लहामटे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, पंचायत समिती सभापती ऊर्मिला राऊत, संगमनेर प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे, तहसीलदार सतीश थिटे, तसेच तालुक्यातील आरोग्य अधिकारी, पंचायती समितीच्या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुश्रीफ पुढे म्हणाले, एक काळ असा होता बाधितांच्या संख्येमध्ये अहमदनगर जिल्हा देशात पहिला होता. 61 गावांमध्ये संपूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला. आज मात्र प्रशासनाच्या सुयोग्य व्यवस्थापनामुळे रूग्णसंख्या आटोक्यात आली आहे. तरीही आपणास गाफील राहून चालणार नाही. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेला सर्वांनी गांभीर्याने घेतले पाहीजे. यासाठी प्रशासन सज्ज आहे.
तिसऱ्या लाटेचा अटकाव करण्यासाठी जनतेने शारीरिक अंतर ठेवणे, मुखपट्टीचा वापर करणे व हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा कायम वापर केला पाहिजे.यासाठी आरोग्य विभागाने जागृती करावी अशा सूचनाही दिल्या.
मुश्रीफ पुढे म्हणाले, देशात 100 कोटी लसीकरणाच्या टप्पा ओलांडला गेला आहे. नगर जिल्ह्यात ही 32 लाख 56 हजार डोसचे लसीकरण झाले आहे. यात दुसरा डोस 8 लाख 44 हजार लोकांनीच घेतला आहे.असे नमूद करून ते म्हणाले, दुसरा डोस घेणारे लोकांची संख्या वाढली पाहीजे यासाठी गावपातळीवरील शासकीय सेवक, सरपंच व लोकप्रतिनिधींनी लोकांमध्ये जाऊन त्यांना कोवीड लसीकरणासाठी प्रवृत्त करावे. लोकांचे समुपदेशन करावे.अशा सूचना करून त्यांनी शासन राबवित असलेल्या मिशन कवच कुंडले व युवा स्वास्थ्य मोहीमेविषयी माहिती दिली.तसेच अकोले येथे उप जिल्हा रूग्णालय निर्माण करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी सादर करावा.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी यावेळी जिल्ह्यातील करोना चाचण्या, लसीकरण, दैनंदिन रूग्णसंख्या, मुत्युदर, सक्रीय रूग्ण, पॉझिटिव्हीटी रेट याबाबत माहिती दिली. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा नियोजनच्या माध्यमातून 153 कोटींची तरतूद करण्यात आली आहे असे सांगितले.
0 टिप्पण्या